जळगाव : भारतीय छात्र संसद फाउंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सहा दिवसांच्या भारतीय छात्र संसदेचे २३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले असून यंदाचे छात्र संसदेचे अकरावे वर्ष असल्याची माहिती विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी रायसोनी महाविद्यालयाच्या संचालिका प्रीती अग्रवाल, युवा शक्तीचे विराज कावडिया, अमित जगताप व मानसी भावसार यांची उपस्थिती होती.
अकराव्या भारतीय छात्र संसदेचे ऑनलाइन उद्घाटन २३ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. समारोप हा २८ रोजी सायंकाळी ५.३० वाजता होईल. सहा दिवस चालणाऱ्या या छात्र संसदेत झारखंडचे राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया, जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत, उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, ॲड. जयवीर शेरगिल, जामयांग त्सेरिंग नामग्याल, डॉ. कृष्णा चौधरी, गिरीष गौतम आदी मान्यवर छात्र संसदेत युवक श्रोत्यांना संबोधित करणार असल्याची माहिती डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांनी दिली.
२५ हजारांहून अधिक विद्यार्थी सहभाग होणार
छात्र संसद हा भविष्यातील राज्यकी नेते घडविणारा देशातील एकमेव व विशाल प्रशिक्षण वर्ग आहे. या संसदेच्या माध्यमातून राजकारण, राजकीय नेते, लोकशाही याकडे बघण्याचा युवकांचा दृष्टिकोन बदलत आहे. या अकराव्या छात्र संसदेत देशभरातील वेगवेगळ्या महाविद्यालयातून २५ हजाराहून अधिक विद्यार्थी सहभाग होणार आहे तसेच देशातील ४० आमदार, ६० विद्यार्थी वक्ते, १२ केंद्रीय मंत्र्यांचा सहभाग असेल, अशी माहिती प्रीती अग्रवाल यांनी दिली. छात्र संसद ही दहा सत्रांमध्ये पार पडणार आहे. त्यामुळे जळगावसह खान्देशातील विद्यार्थ्यांनी या मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. विद्यार्थ्यांना भारतीय छात्र संसदेच्या संकेतस्थळावर आपली नोंदणी करता येणार आहे.