जालना : गेली आठ वर्षे न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या विवाहितेला अखेर यश मिळाले आहे. जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त कारवाईत, तब्बल आठ वर्षांपासून फरार असलेल्या पतीला मुंबईतून अटक करण्यात आली.
संदीप अनिल खरात (४०,रा. प्रतीक्षानगर, सायन, मुंबई) याच्याविरुद्ध पत्नीने भरणपोषणासाठी जालना येथील कुटुंब न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने दरमहा २०,००० रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला होता. मात्र आदेश झुगारून संदीप फरार झाला होता. गेल्या आठ वर्षांत जामीनपात्र व अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले गेले तरीही अटक शक्य झाली नव्हती.
कायद्याच्या अभ्यासक असलेल्या पीडित विवाहितेने, पोलिस यंत्रणेशी सातत्याने संपर्क ठेवत, हक्कासाठी संघर्ष सुरू ठेवला. अखेर अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई पोलिसांच्या मदतीने संदीप खरात याला अटक केली.
संदीप मुंबईतील वर्तकनगर येथील एका लग्न समारंभात सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली होती. लग्न समारंभात सापळा रचून पोलिसांनी संदीपला ताब्यात घेतले. अटकेच्यावेळी त्याने ‘तो मी नव्हे’ असे म्हणत खोटी ओळख सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने खरी ओळख व गुन्हा कबूल केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनात रामप्रसाद पव्हरे आणि कदीम जालना पोलिस ठाण्याचे कर्मचारी भाले यांनी मुंबई पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.
सहा महिन्यांची कैददरम्यान, पीडित पत्नीने भरणपोषणासाठी दावा दाखल केला होता. पत्नी व मुलीच्या संगोपनासाठी त्यांनी दरमहा २०,००० रुपये पोटगी देण्याचे आदेश असूनही, संदीप यांनी वेळोवेळी पोटगी रक्कम भरण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पत्नीने न्यायालयात अर्ज दाखल करत कारवाईची मागणी केली होती. पोलिसांनी आरोपीस न्यायालयासमोर उभे केले. न्यायालयाने संदीप खरात याला सहा महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावत, तसेच थकबाकी रक्कम तत्काळ भरण्याचे आदेश दिले आहेत.