व्हायरल ऑडिओ क्लिप: लोणीकर म्हणतात क्लिप खोटी, राजेश टोपेंनी केले ट्विट

By विजय मुंडे  | Published: December 14, 2023 09:30 PM2023-12-14T21:30:17+5:302023-12-14T21:31:09+5:30

आ. राजेश टोपे आणि आ. बबनराव लोणीकर यांच्यामध्ये मोबाईलवर झालेल्या संवादाची एक ऑडिओ क्लिप गुरूवारी सोशल मीडियावर व्हायरल झाली.

Viral audio clip: babanrao Lonikar says clip is fake, Rajesh Tope tweeted | व्हायरल ऑडिओ क्लिप: लोणीकर म्हणतात क्लिप खोटी, राजेश टोपेंनी केले ट्विट

व्हायरल ऑडिओ क्लिप: लोणीकर म्हणतात क्लिप खोटी, राजेश टोपेंनी केले ट्विट

जालना: माजी मंत्री आ. राजेश टोपे, माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर यांच्यामध्ये मोबाईलवर झालेल्या संवादाची एक ऑडिओक्लिप गुरूवारी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. जिल्हा बँक पदाधिकारी निवडीवरून झालेल्या संवादामध्ये एका मंत्र्यांनी असभ्य भाषेचा वापर केल्याने राजकीय गोटात चांगलीच चर्चा रंगली आहे. असे असले तरी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी ती क्लिप खोटी असल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे माजी मंत्री आ. राजेश टोपे यांनी ट्विट करीत राज्याची संस्कृती ही ओव्यांची आहे शिव्यांची नाही, असे म्हटले आहे.

जिल्हा बँकेच्या १७ पैकी १५ जागा सर्वपक्षीय नेतेमंडळींच्या पुढाकारातून बिनविरोध काढण्यात यश आले होते. दोन जागांसाठी निवडणूक प्रक्रिया झाली होती. या निवडणुकीनंतर जिल्हा बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडीसाठी बैठक झाली. या बैठकीनंतर उपाध्यक्ष निवडीच्या कारणावरून लोणीकर गट आणि टोपे गट भिडला होता. आ. राजेश टोपे यांच्या कारवर दगडफेक झाली हाेती. तर चेअरमन सतीश टोपे, आ. बबनराव लोणीकर यांच्या घरावरही दगडफेक झाली होती.

परंतु, या प्रकरणाशी जुळणारी एक ऑडिओ क्लिप गुरूवारी साेशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. एका माजी मंत्र्याने दुसऱ्या माजी मंत्र्याला असभ्य भाषेत शिव्यांची लाखोली वाहिल्याचे ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत आहे. सोशल मीडियावर ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आ. टोपे यांनी एक ट्विट केले आहे. महाराष्ट्राची परंपरा सुसंस्कृत राजकारणाची आहे. आम्ही ही परंपरा निष्टेने जपत आलो आहोत. राज्याची संस्कृती ही ओव्यांची आहे. शिव्यांची नाही. खालच्या पातळीचे राजकारण हा आमचा कधीच विषय नाही आणि नव्हता देखील. राजकीय जीवनातील संस्कृती, मर्यादा आणि सभ्यता याचाच आम्ही पुरस्कार करीत आलो आहोत. अशा आशयाचे ट्विटमध्ये नमूद केले आहे. त्यामुळे हे ट्विट व्हायरल ऑडिओ क्लिपशी संबंधित असल्याची चर्चाही रंगली होती.

ऑडिओ क्लिप शंभर टक्के खोटी आहे. जे काय बोलायचे ते समोरासमोर बोललो. अर्जुन खोतकर, अरविंद चव्हाण यांच्यासमोर बोललो. बैठकीत चर्चा झाली होती. जे काय बोलायचे ते आपण समोर बोलू. परंतु, ऑडिओ क्लिप कशी झाली मला माहिती नाही.-आ. बबनराव लोणीकर, माजी मंत्री

Web Title: Viral audio clip: babanrao Lonikar says clip is fake, Rajesh Tope tweeted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.