Manoj Jarange Patil: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांच्यासह खासदार संदिपान भुमरे यांनी आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. बीड दौरा आटोपून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेल्या उदय सामंत यांनी अचानक आपल्या नियोजित कार्यक्रमात बदल करत जरांगे पाटील यांची भेट घेतली. पैठण फाटा येथील छत्रपती भवन इथं ही भेट झाल्याचे समजते. या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्यांबाबत आपण काही दिवसांत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अवगत करणार असल्याचे आश्वासन सामंत यांनी दिलं आहे.
उदय सामंत म्हणाले की, "शासनाचा प्रतिनिधी म्हणून माझ्यासमोर मनोज जरांगे यांनी मांडलेल्या विविध मागण्यांची माहिती मी येत्या २३ तारखेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देणार आहे," असं सामंत यांनी सांगितलं. या मागण्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असंही त्यांनी आश्वस्त केलं आहे.
मनोज जरांगेंचा पुन्हा आंदोलनाचा इशारा
मागील अनेक महिन्यांपासून मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण द्यावं, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाआ आहे. "सरकारला आरक्षणासाठी दिलेली ३० एप्रिल ही मुदत लवकरच संपत आहे. सरकारने आमच्या मागण्या मंजूर केल्या नाहीत तर समाजाची राज्यव्यापी बैठक घेऊन मुंबईत आंदोलन करू," असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
दरम्यान, "मराठा समाजाचे तीनही गॅजेटीयर लागू करा. कुणबी नोंदी शोधण्यासाठी वेग द्या. कुणबी प्रमाणपत्र न देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा," अशा मागण्या मनोज जरांगे यांनी सरकारकडे केल्या आहेत.