बदनापूर : शेतकऱ्यांच्या टोमॅटोला एकरी ५० हजार रुपये अनुदान तत्काळ द्यावे, तसेच बारा लाख टन जीएम सोयापेंडची आयात रद्द करावी, नसता शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. या मागणीचे निवेदन बदनापूर तहसीलदारांना देण्यात आले. शिवाय, तहसीलदारांना टोमॅटो भेट देण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या टोमॅटोला १ रुपया किलोचा भाव मिळत आहे. त्यामुळे लागवडीवर केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. बहुतांश शेतकरी टोमॅटो रस्त्यावर फेकून देत आहेत. तर काही शेतकऱ्यांनी भाव मिळत नसल्याने आत्महत्यादेखील केल्या आहेत. शासनाने शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला भाव द्यावा, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. मागणी मान्य न केल्यास मनसे शेतकऱ्यांचा माल खरेदी करून तहसील कार्यालयात लाल चिखल करेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या वेळी जिल्हाध्यक्ष गजानन गिते, बदनापूर तालुकाध्यक्ष विष्णू शिंदे, कैलास खेंडके, गणेश शिंदे, रवी मदन, शिवाजी पवार, बदनापूर शहराध्यक्ष संजय जराड, कैलास नरोडे, सचिव ज्ञानेश्वर कातुरे, सर्कल अध्यक्ष नितीन कदम, अनिकेत जारे, गजानन जोशी, भारत ठोंबरे, योगेश पवार, विष्णू नागते, भाऊसाहेब दराडे आदींची उपस्थिती होती.