वडीगोद्री (अंबड) : धुळे–सोलापूर महामार्गावर आज दुपारी ४. ३० वाजता अक्षरशः थरारक दृश्य पाहायला मिळाले. शिवाजीनगर, वडीगोद्री जवळून जात असताना टायर अचानक फुटल्याने अनियंत्रित होऊन क्रूझर गाडी थेट दुभाजक ओलांडत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या नालीत कोसळली. या भीषण अपघातात ८ ते ९ जण जखमी झाले असून त्यापैकी ४ जणांची प्रकृती गंभीर आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपुरा येथील वाद्यवृंद मंडळी बीड जिल्ह्यातील एका कार्यक्रमासाठी क्रूझर गाडीने (MH-14 DV-7766) निघाले होते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास वडीगोद्रीजवळील शिवाजीनगर परिसरात टायर फुटल्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि काही क्षणातच गाडी उलट बाजूला जाऊन अपघातग्रस्त झाली.
अपघात होऊन मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत मदत कार्य सुरु केले. महामार्गावरील आणि समर्थ कारखाना येथील रुग्णवाहिका बोलावून जखमींना तातडीने पाचोड ग्रामीण रुग्णालयात हलवले. जखमींची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.