Tension in Babhulgaon | विवाहितेच्या मृत्यूने बाभूळगावात तणाव
विवाहितेच्या मृत्यूने बाभूळगावात तणाव

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : दोन महिन्यापूर्वी लग्न झालेल्या आम्रपाली बाबासाहेब काळे या विवाहितेने सोमवारी सायंकाळी घरात अंगावर रॉकेल ओतून घेऊन जाळून घेतले होते. उपचारासाठी तिला औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात नेण्यात आले होते. परंतु तेथेच तिची प्राणज्योत मालवली. मंगळवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यावर संतप्त नातेवाईकांनी औरंगाबादहून शववाहिनी थेट भोकरदन पोलीस ठाण्यात आणली. पतीसह सासरच्या मंडळींना अटक करा, अशी मागणी करत तेथे मोठा गोंधळ घातला. यामुळे बंदोबस्त वाढवून पोलिसांनी आम्रपालीच्या नातेवाईकांना शांत केले.
भोकरदन तालुक्यातील चांदई टेपली येथील शिवाजी दामोदर घारपडे यांची आम्रपाली ही मुलगी होती. तिचा विवाह भोकरदन तालुक्यातीलच बाभूळगाव येथील बाबासाहेब काळे या युवका सोबत १८ एप्रिल २०१९ ला झाला होता. बाबासाहेब काळे हा औरंगाबादेतील एका कंपनीत कामावर होता. त्याला कंपनीत जाण्यासाठी मोटार सायकल खरेदीसाठी आम्रपालीने माहेराहून ५० हजार रूपये आणावेत म्हणून सासरच्या मंडळीकडून आम्रपालीचा छळ केला जात असल्याची तक्रार शिवाजी घोरपडे यांनी भोकरदन पोलिसांत दिली. त्यावरून पोलिसांनी आम्रपालीचा पती बाबासाहेब काळेला अटक केली आहे.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोन्ने, मिलिंद खोपडे, वैशाली पवार, सुदाम भागवत तसेच तपास अधिकारी ज्ञानेश्वर साकळे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी तळ ठोकून होते. रात्री ९.३० वाजेच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले.
बाभुळगाव येथे या सर्व प्रकारामुळे संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यासाठी पारध, जाफराबाद, भोकरदन येथून पोलीस बंदोबस्त मागविला होता. घडलेला प्रकार नेमका काय आहे, हे काही जणांना न कळाल्यानेही गावात उशिरापर्यंत तणावाची स्थिती निर्माण झालेली होती.
पोलिसांची मध्यस्थी
दरम्यान मंगळवारी दिवसभर मयत आम्रपालीवर अंत्यसंस्कार करण्यावरून मोठा वाद झाला. प्रथम आम्रपालीच्या माहेरच्या नातेवाईकांनी आम्रपालीवर अंत्यसंस्कार पती बाबासाहेब काळे यांच्या घरासमोरच करण्याचा हट्ट धरला आणि सरणही रचले.
परंतु पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील जायभाये तसेच अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून या प्रकरणातील अन्य आरोपींना अटक करण्याचे लेखी आश्वासन दिल्यावर रात्री स्मशानभूमीत आम्रपालीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 


Web Title: Tension in Babhulgaon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.