- पवन पवार
वडीगोद्री : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीत उपोषणाच्या चौथ्या दिवशी प्रकृती खालवली. त्यामुळे मंगळवारी मध्यरात्री उपोषण स्थळीच मनोज जरांगे पाटील यांना सलाईनद्वारे उपचार सुरू केले आहेत. मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत त्यांना सहा सलाईन लावण्यात आल्या आहेत, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
मनोज जरांगे पाटील यांची आमरण उपोषणाच्या चौथ्या दिवशी प्रकृती खालवली होती. काल रात्री भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यादरम्यान मनोज जरांगे यांनी सलाईन घ्यावी, अशी विनंती सुरेश धस यांनी केली होती. त्यानंतर डॉक्टर आणि मराठा आंदोलकांच्या आग्रहानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपचारास होकार दिला आहे.
उपोषणस्थळी रात्री उशिरा भाजप आमदार सुरेश धस यांनी भेट दिली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत, त्यांनी मनोज जरांगे यांना सलाईन घेण्याचा आग्रह धरला होता. तसेच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यात मराठा आरक्षणाच्या मागण्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे. आज मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे.