जाफराबाद (जि. जालना) : वाळू खाली करून येणाऱ्या टिप्परने दुचाकीला जोराची धडक दिल्याची घटना जाफराबाद तालुक्यातील चिंचखेडा पाटीजवळ मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली. यात दुचाकीस्वार राजू शुकालाल पवार (४०), शोभा राजू पवार (३५ रा. दत्तपूर, ता. सिंदखेड राजा) हे दोघे जागीच ठार झाले.
राजू पवार व त्यांची पत्नी शोभा पवार हे दोघे मंगळवारी सकाळी दुचाकीने सिंदखेड राजा येथून जाफराबादमार्गे सिल्लोडकडे जात होते. माहोरा जवळील चिंचखेडा पाटीजवळ आल्यावर वाळू खाली करून टिप्परने (क्र. एमएच.०६.बी.डी.९८८९) दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. यात राजू पवार व शोभा पवार यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रमेश जायभाये, पोलीस उपनिरीक्षक युवराज पोटरे, पोलीस हवालदार बी. टी. सहाने यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. टिप्पर चालक गणेश ताकमोघे यास अटक करून टिप्पर जप्त केले आहे. घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी जाफराबाद येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला होता. पुढील तपास माहोरा बीटचे जमादार सहाने हे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
अकोला देव गावात शोककळाराजू पवार यांची बहीण जाफराबाद तालुक्यातील अकोला देव येथील सरपंच असून, लग्नाला जाण्यापूर्वी ते बहिणीस भेटून गेले होते. मध्येच त्यांच्यावर काळाने झडप घातली. त्यामुळे अकोला देव गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील असा परिवार आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राजू पवार उपसरपंच झाले होते.