आरक्षणाचे परिश्रम सार्थकी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:08 AM2019-06-28T00:08:01+5:302019-06-28T00:08:06+5:30

उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक निर्णय दिला. हा निर्णय जाहीर होताच संपूर्ण जिल्हाभर जल्लोष साजरा करण्यात आला.

Reservation of Reservation ... | आरक्षणाचे परिश्रम सार्थकी...

आरक्षणाचे परिश्रम सार्थकी...

Next

जालना : प्रचंड पाठपुरावा आणि तेवढाच शांततामय लढा उभारून मराठा समाजाने आरक्षणासाठी एक प्रकारे चंग बांधला होता. या त्यांच्या भगीरथ प्रयत्नांना यश आले आहे. गुरुवारी मुंबई येथील उच्च न्यायालयानेमराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक निर्णय दिला. हा निर्णय जाहीर होताच संपूर्ण जिल्हाभर जल्लोष साजरा करण्यात आला. एकूणच या लढ्यामध्ये महिला, पुरूष आणि युवक युवतींनी देखील झोकून देऊन सहभाग घेतला. हे आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकारने देखील जो पुढाकार घेतला त्याचेही विविध स्तरांतून स्वागत होत आहे. भविष्यात या आरक्षणामुळे अनेकांना चांगल्या क्षेत्रात संधी निश्चित मिळतील.
सरकारची वचनपूर्ती
राज्य सरकारने मराठा समाजाने उभारलेल्या आरक्षणाच्या लढ्याला सकारात्मक प्रतिसाद त्याच वेळी दिला होता. मुंबई येथील मोर्चा छत्रपती संभाजी राजे यांनीच सरकारकडून मोर्चेकऱ्यांना आरक्षणासंदर्भातील माहिती दिली होती. आणि हे आरक्षण सरकारने जाहीर केले. ते आरक्षण आज न्यायालयानेही मान्य केल्याने सरकारची एक प्रकारे ही वचनपूर्तीच होय.
- रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री

संघर्षाला मिळाले यश
कुठल्याही मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी संघर्ष आणि पाठपुरावा करावा लागतो. हा पाठपुरावा करताना समाजाने जी एकजूट दाखविली, ती निश्चितच प्रेरणादायी होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांची मुत्सद्देगिरी आरक्षण मिळवून देण्यास यशस्वी ठरली.
- बबनराव लोणीकर, पालकमंत्री

एकजुटीचा विजय
मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्यावरून जो शांततापूर्ण लढा उभारला होता, त्यातून आंदोलनाचा एक आदर्श घालून दिला आहे. समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अनेकांनी प्राणांचे बलिदान दिले. न्यायालयीन लढाई देखील लढली, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांचेही स्वागत करणे गरजेचे आहे. या दोघांनी जे प्रयत्न केले, त्यामुळेही हे शक्य झाले आहे. - अर्जुन खोतकर, राज्यमंत्री

युवकांची जिद्द फळाला
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून ज्याप्रमाणे समाजातील ज्येष्ठांनी एक रणनीती ठरविली होती त्यात युवकांचा सहभाग हा लक्षणीय होता. युवक युवतींनी मोर्चाचे जे नियोजन केले होते. ते वाखाणण्याजोगे होते. एकूणच हे आरक्षण मिळण्यासाठी समाजातील प्रत्येकाचाच खारीचा वाटा आहे. - राजेश राऊत, उपनगराध्यक्ष
महिलांचाही सिंहाचा वाटा
मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पुरूषांप्रमाणेच महिला देखील संघर्षामध्ये तेवढ्यात ताकदीने सहभागी झाल्या होत्या. क्रांतीमोर्चा काढल्यानंतर प्रशासनाला जे निवेदन द्यायचे होते, त्याचे वाचन आणि त्याची तयारी युवतींनी केली होती. त्याचे निश्चित श्रेय हे त्यांना दिले पाहिजे. सरकारने देखील सकारात्मक दृष्टिकोन दाखविल्याने ते शक्य झाले आहे.
- विमलताई आगलावे,
महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष

निर्णयाचे स्वागतच
मराठा समाजातही अनेकजण गोरगरीब आणि हलाखीचे जीवन जगतात. त्या कष्टकऱ्यांच्या मुला-मुलींना आता शिक्षण आणि नोकरीमध्ये हक्काचे आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे आपण स्वागत करत असून, शांततेच्या मार्गाने एखादी गोष्ट कशी पदरात पाडून घ्यावी, हे मराठा समाजाने दाखवून दिले. एकूणच समाजातील प्रत्येक घटकाने केलेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संघर्ष फळाला आला.
- अरविंद चव्हाण, माजी आमदार
जिद्दीला सलाम
मराठा समाजाने आरक्षणासाठी ज्या जिद्दीने लढा उभारून तो तडीस नेला आहे, त्याबद्दल समाज बांधवांचे स्वागतच केले पाहिजे. कुठल्याही पातळीवर मागे न हटता आरक्षणासाठी जिवाचे रान केले. समाजातील पन्नासपेक्षा अधिक जणांनी प्राणांची आहुती दिली आहे, हे विसरून चालणार नाही.
- आर.आर. खडके, जालना
गुन्हे मागे घ्यावेत
आरक्षणासाठी मराठा समाजाने ज्याप्रमाणे शांतताप्रिय मार्गाने मोर्चे काढले, ते प्रेरणादायी होते. परंतु एवढे करूनही सरकार आरक्षण देत नव्हते. त्यावेळी समाज काही ठिकाणी हिंसक झाला होता. परंतु त्यातही समाजातील दृष्ट प्रवृत्ती सहभागी झाल्याने समाज बदनाम झाला होता. या आंदोलन काळात ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, ते मागे घ्यावेत. - भीमराव डोंगरे
न्यायालयीन लढा महत्त्वाचा
समाजाने आरक्षण मिळण्यासाठी ज्या प्रमाणे रस्त्यावरची लढाई लढली. त्याचप्रमाणे कायदेशीरदृष्ट्याही भक्कम बाजू मांडण्यात आली. मागासवर्गीय आयोगाने जो अहवाल अत्यंत कमी कालावधीत दिला, त्यामुळेही आरक्षण मिळण्यास मदत झाली. कमी झालेली टक्केवारी नंतर पाठपुरावा करून वाढवून घेतली जाईल.
- डॉ. संजय लाखे पाटील

Web Title: Reservation of Reservation ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.