- फकिरा देशमुखभोकरदन (जालना): राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो, याचा प्रत्यय शुक्रवारी (दि. २७) लाडगाव येथील एका विवाह सोहळ्यात आला. एकमेकांवर टोकाची टीका करणारे माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी एकाच सोफ्यावर बसून केवळ गप्पाच मारल्या नाहीत, तर त्यांच्यातील खुमासदार टोलेबाजीने उपस्थित वऱ्हाड्यांची चांगलीच करमणूक केली.
साखरपुडा झाला 'झटपट' विवाह! शासकीय कंत्राटदार सोमनाथ हराळ यांचे चिरंजीव दादाराव आणि भरत घोरपडे यांची कन्या सुषमा यांचा साखरपुडा आदिती लॉन्सवर सुरू होता. या कार्यक्रमाला गर्दी पाहून रावसाहेब दानवे यांनी एक भन्नाट प्रस्ताव मांडला. "गर्दी जास्त आहे, आताच लग्न उरकून घेऊया का?" असे दानवे यांनी सुचवले आणि दोन्ही बाजूंच्या परिवाराने त्याला आनंदाने होकार दिला. अशा प्रकारे साखरपुड्याचे रूपांतर काही वेळातच विवाहाच्या सोहळ्यात झाले.
सत्तारांचा चिमटा अन् दानवेंचा 'बाउन्सर' वधू-वरांना शुभेच्छा देण्यासाठी अब्दुल सत्तार उभे राहिले तेव्हा त्यांनी दानवेंचा पाय खेचण्याची संधी सोडली नाही. सत्तार म्हणाले, "दानवे साहेबांनी आज आयुष्यात पहिल्यांदाच एखादं चांगलं काम केलं (लग्न लावून देण्याचं), त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो."
त्यानंतर माईक हातात घेताच रावसाहेब दानवे यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. "सत्तार साहेबांनी मी चांगलं काम केलं म्हणून अभिनंदन केलं, त्याबद्दल आभार. पण मला आठवतंय, मी तर भरपूर चांगली कामं केलीत, पण सत्तार साहेबांनी आयुष्यात आजवर एकही चांगलं काम केल्याचं मला आठवत नाही!" दानवे यांच्या या गुगलीवर संपूर्ण मांडवात एकच हशा पिकला आणि स्वतः अब्दुल सत्तार यांनाही हसू आवरले नाही.
दोन दिवसांपूर्वीची कटुता विसरले! विशेष म्हणजे, दोन-तीन दिवसांपूर्वीच या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर 'गोल टोपी' आणि 'बोगस मतदान' यावरून गंभीर आरोप करत तोंडसुख घेतले होते. मात्र, लग्नाच्या मांडवात ही सर्व कटुता बाजूला सारून दोन्ही नेते मैत्रीच्या आणि विनोदाच्या मूडमध्ये दिसले. वधू-वरांसोबत फोटो काढून दोन्ही नेते आपापल्या मार्गाने रवाना झाले, पण त्यांची ही टोलेबाजी मात्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
Web Summary : Rivals Danve and Sattar, forgetting political bitterness, engaged in humorous banter at a wedding. Danve quipped about Sattar's lack of good deeds, delighting the attendees. A quick wedding was arranged spontaneously during the engagement.
Web Summary : राजनीतिक प्रतिद्वंद्वी दानवे और सत्तार एक शादी में अपनी कड़वाहट भूलकर मजाकिया अंदाज में दिखे। दानवे ने सत्तार के अच्छे कामों की कमी पर चुटकी ली, जिससे मेहमान खुश हो गए। सगाई के दौरान अचानक शादी तय हो गई।