रांजणी : घनसावंगी तालुक्यातील करडगाव येथे स्वयंभू शनिमूर्तीची गुरुवारी विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
घनसावंगी तालुक्यातील करडगाव येथे नारायण रखमाजीबुवा गिरी यांच्या राहत्या घरी नोव्हेंबर महिन्यात दरवाजाच्या चौकटीच्या आतील बाजूस दोन फूट उंचीची व दहा इंच रुंदीची स्वयंभू शनिमूर्ती निघाली होती. शनिमूर्ती निघाल्यानंतर विधिवत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गोळेगाव (जि.परभणी) येथील ब्रह्मवृंदाकडून तीन दिवस पूजाविधी करून मूर्ती पूर्वाभिमुख बसविण्यात आली. गावातील अकरा दाम्पत्ये पूजेला बसविण्यात आले होते. तिन्ही दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांसह ह.भ.प. भरत महाराज तांबेकर, ह.भ.प. लक्ष्मण महाराज पुरी व ह.भ.प. तुकाराम महाराज कडपे यांचे कीर्तन झाले. शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.