जालना : माढा तालुक्यातील कव्हे येथील कृष्णा चोपडे यांची दुचाकी मंगळवारी ऊसतोडीसाठी मजूर देतो तसेच बहिणीला भेटून येतो, अशी बतावणी करत एकाने पळवून नेली. चोपडे यांना स्वत:चे विजय गवळी असे खोटे नावही सांगितले. दुचाकी घेऊन संशयीत परत न आल्याने चोपडे यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
जालन्यात ढग दाटलेले
जालना : जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम आहे. शुक्रवारी दिवसभर शहरात सूर्य दर्शन झाले नाही. जालना शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे थंडीचा जाेरही कमी झाला आहे. मात्र, ढगाळ वातावरणामुळे पिके धोक्यात आली आहे.
व्यापारी महासंघाचे केंद्रीयपथकाला निवेदन
जालना : जालना-खामगाव रेल्वे मार्गाला तातडीने मंजुरी देऊन काम सुरू करावे, अशी मागणी व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन सर्वेक्षणासाठी आलेल्या केंद्रीयपथकाला देण्यात आले. याप्रसंगी हस्तीमल बंब, दीपक भुरेवाल, सतीश पंच, अशोक पांगारकर, गेंदालाल झुंगे आदींची उपस्थिती होती.
आष्टी परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे
जालना : परतूर तालुक्यातील आष्टी येथे गेल्या काही दिवसापासून दारू मटका, जुगार असे अवैध धंदे सुरू आहेत. अवैध दारूसह जुगारामुळे गुन्हेगारीचे तसेच वादविवादाचे प्रकार होत आहेत. पोलीस प्रशासनाने अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभागाचे गौतम शेळके, शिवाअप्पा खिस्ते, मुर्तुजा कल्याणकर, राजेभाऊ आढावा, सत्तार कुरेशी, बाबासाहेब बागल, संतोष रोहीमल यांनी केली.
एक लाख क्विंटल कापसाची खरेदी
जालना : घनसावंगी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सुरू असलेल्या सीसीआयच्या चार कापूस खरेदी केंद्रावर गुरूवारपर्यंत एक लाक क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या वतीने सीसीआयचे केंद्रप्रमुख पवन बोबडे व बाजार समितीचे केंद्रप्रमुख राहुल गुजर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अरविंद सिंग, मनिष तापडीया, रामदास बागल आदी उपस्थित होते.
संघटनेच्यावतीने स्वेटरचे वाटप
जालना : जिल्हा माहेश्वरी महिला संघटनेच्यावतीने बेघर निवारा केंद्रातील ६० गरजू महिला, पुरुषांना मोफत स्वेटरचे वाटप करण्यात आले. जिल्हाध्यक्ष निर्मला साबू यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. निर्मल करवा, चंद्रकला भक्कड व इतरांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी जिल्हा सचिव मीनाक्षी दाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी राजेश्री दरक, नूतन दाड, सपना मुंदडा, सरोज करवा, मनीषा भंडारी यांची उपस्थिती होती.
जागा राखीव ठेवण्याची मागणी
जालना : ओबीसी या प्रवर्गात ३४६ जातींचा समावेश असून, या प्रवर्गासाठी खासदार, आमदारांच्या जागा राखीव ठेवाव्यात, अशी मागणी ओबीसी एकता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब वानखेडे यांनी केली आहे. भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ओबीसी प्रवर्गाला खासदार, आमदार पद राखीव नाही. ओबीसी प्रवर्गात ३४६ जाती असून, ५२ टक्के समाज असलेला हा प्रवर्ग या आरक्षणापासून वंचित असल्याचे ते म्हणाले.