जालना : मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बुधवारी रात्री उशिरा राज्यातील शिवसेनेचे मंत्री, राज्यमंत्री व जिल्हाप्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधून ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा घेतला. जालना जिल्ह्याच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी या आढावा बैठकीत सहभागी होऊन जालना जिल्ह्यातत १५ जानेवारी रोजी होणाऱ्या ४७४ ग्रामपंचायतीची तालुकानिहाय माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिली.
ट्रॅक्टरला धडकली भरधाव जीप
जालना : औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील शहगडच्या उड्डाणपुलाजवळ गुरूवारी रात्री सात वाजेच्या सुमारास कापुस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना भरधाव जीपची पाठीमागून जोराची धडक बसली. या घटनेत पाचजण जखमी झाले आहेत. अविनाश दत्तू मिसाळ, (वय४२ रा. पाचोड) हे गंभीर जखमी झाले. तर दयानंद सोनाजी हंगारगे (वय४०), जॉन्सन दिनकर हंगारगे, प्रभाकर जनार्दन पाटोळे (वय ३५), शिराज दुलात पठाण (वय ४० रा. दूनगाव ता अंबड) असे चौघे जखमी झाले आहेत. जखमींवर औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात उपचार सुरू आहे.
वडीगोद्रीजवळ ट्रक उलटला
जालना : वडीगोद्रीजवळ सिमेंट घेऊन जाणारा ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात उलटला. हा अपघात गुरूवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वडीगोद्रीजवळ घडला. औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीडहून औरंगाबादकडे सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे वडीगोद्रीजवळील सर्व्हिस रोडच्या खाली जाऊन खड्यात ट्रक उलटला.
वृध्द व्यक्तीवर कुत्र्यांचा हल्ला
जालना : शहरातील बसस्थानकावरून घराकडे जात असताना देहेडकरवाडी वेशीमध्ये दोन कुत्र्यांनी हल्ला केल्याने वृध्द झाला. जानी खान इसाक खान असे जखमीचे नाव आहे. काही जणांनी कुत्र्यांना दगड मारल्यामुळे कुत्रे पळाले. यानंतर जखमीला गांधी चमन येथईल शासकीय रूग्णालयात दाखल केले.