जालना : शहरातील भोकरदन चौफुली येथे सिग्नलची व्यवस्था नसल्याने धोकादायक बनली आहे. या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भोकरदन चौफुलीवर वाहतूक सिग्नल व्यवस्था नाही तसेच या रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. भोकरदन चौफुलीवर नवीन मोंढा रस्त्यावरून येणारी वाहतूक, अवजड वाहनांची वर्दळ जास्त असते. औरंगाबादमार्गे बायपास रस्त्याने देऊळगाव राजाकडे जाणारी वाहतूक पाहता सिग्नल यंत्रणाच नसल्याने चौफुलीवर अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे.
जिल्हाध्यक्षपदी सोनवणे, सल्लागारपदी कुलकर्णी
जालना : महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विषय शिक्षक जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी डॉ. राजेंद्र सोनवणे तर सल्लागारपदी प्रा. अरुण कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे राज्याध्यक्ष प्रा. सुनील डिसले, सचिव प्रा. बाबासाहेब माने यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. उर्वरित कार्यकारिणीत प्रसिध्दीप्रमुखपदी डॉ. सुहास सदावर्ते, रमाकांत कुलकर्णी, निवृत्ती मोरे, संतोष पठाडे, प्रकाश अकोलकर आदींची निवड करण्यात आली. या निवडीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
परतूर येथे दत्त जयंतीनिमित्त सोहळा
परतूर : शहरातील देशपांडे गल्लीतील हनुमान मंदिरातील श्रीदत्त जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. श्री दत्त जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. सध्या कोरोनाबाबत खबरदारी घेत यंदा दत्त जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. यात पहाटे चार वाजेपासून कार्यक्रमांना प्रारंभ होतो. जवळपास ३५ साधक श्री गुरूचरित्र पारायणात सहभागी झाले आहेत.
कन्हैयानगर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
जालना : शहरातील जैन हिंदी विद्यालय ते कन्हैयानगर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. रहदारीच्या या रस्त्यावर खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहनधारक खड्ड्यात पडून जखमी होत आहेत. गत काही वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. नगरपालिका विभागाने तात्पुरते खड्डे न बुजविता या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
स्वच्छतागृह नसल्याने अडचण
जालना : शहरातील फुले मार्केट परिसरातील मुख्य बाजारपेठेत सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ग्रामीण भागातील नागरिक खरेदी तसेच इतर कामांसाठी मोठ्या प्रमाणात शहरात येतात. मात्र, या भागात कुठेच सार्वजनिक स्वच्छतागृह नाही. परिणामी महिलांची कुचंबना होते. नगरपालिका प्रशासनाने मुख्य बाजारपेठेत सार्वजनिक स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
हसनाबाद परिसरात अवैध गुटखाविक्री
भोकरदन : अन्न -औषधी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भोकरदन तालुक्यासह हसनाबाद परिसरात अवैध गुटखा सर्रास मिळत आहे. सहजरित्या गुटखा मिळत असल्याने तरुण मुले गुटख्याच्या आहारी जात असून व्यसनाधिन बनत आहेत. राज्यात गुटख्यावर बंदी आहे. परंतु, भोकरदन तालुक्यात सर्रास गुटखाविक्री होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
भोकरदनमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट
भोकरदन: भोकरदन शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर, गल्लीबोळात झुंडीने फिरणाऱ्या या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतला आहे. परंतु, नगरपालिकेने अजूनही या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मोकाट कुत्र्यांमुळे ये-जा करणारे लहान मुले, वृध्द नागरिक तसेच दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. याकडे भोकरदन नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शहरवासियांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
मोकाट कुत्र्यांचा उच्छाद
रामनगर : जालना तालुक्यातील रामनगर गावात मागील काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. आतापर्यंत या मोकाट कुत्र्यांनी अनेक जणांना चावा घेऊन जखमी केले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
इंटरनेट सेवा विस्कळीत
मंठा : तालुक्यात मागील काही दिवसांपासून सर्वच कंपन्यांची इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. तर मोबाईलला नेटवर्क नसल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. शासकीयसह खासगी रुग्णालयातील कामे बंद पडली आहेत.
पेट्रोलची अवैध विक्री
तळणी : मंठा तालुक्यातील तळणी बसस्थानक भागात अवैध पेट्रोल विक्री जोरात सुरू आहे. पेट्रोलपंपावर नियोजन नसल्याचा फायदा अवैध पेट्रोल विक्री करणारे घेत असून, चढ्या दराने पेट्रोल विक्री सुरू आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे.