वडीगोद्री (जालना)- मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. 'आता विजयाचा गुलालच घेऊन मुंबईतून बाहेर यायचे आहे. मुंबईत 12-13 दिवस राहण्याची सोय करून या. मुंबईत जर एखाद्याला काठी लागली किंवा गाडीला काही झाले, तर महाराष्ट्रातील आमदाराचा कार्यक्रम करणार', असे म्हणत जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना मुंबईची तयारी करण्याचे आवाहन केले.
मराठा आरक्षण व 29 ऑगस्ट ला मुंबईल जाण्याच्या तयारी साठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंबड तालुक्यातील महाकाळा येथे गोदाकाठच्या 123 गावातील मराठा बांधवांची बैठक घेतली. यावेळी मराठा समाजाला मुंबईला जाण्याची तयारी आज पासूनच करा असे आवाहन देखील केले.
'देवेंद्र फडणवीस याला सरकार वाचवायचे, पण मला माझा मराठा वाचवायचा. वेळप्रसंगी जीव गेला तरी चालेल, पण तुमच्याशी बेइमानी करणार नाही. तुमचे लेकरं बाळं मोठे व्हावे, यासाठी शत्रुत्व अंगावर घेतले आहे. उपोषणामुळे माझे शरीर मला साथ देत नाही. मी अर्धवट मरणार नाही, मला मराठ्यांना आरक्षण देऊन मरायचे आहे. आम्ही कोणाच्या बापाचे आरक्षण घेत नाही, आमचे हक्काच आरक्षण आहे. गप्प बसू नका, गाफिल राहू नका. आरक्षण अमृत आहे, हे सोडू नका,' असेही मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप'देवेंद्र फडवणीस हे छगन भुजबळच्या आड ओबीसी मराठा वाद लावून देण्याचे काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अंतरावलीमध्ये हल्ला घडवून आणला, संतोष देशमुख खून प्रकरणांमध्ये सह आरोपी देवेंद्र फडणवीस यांनी होऊ दिले नाही. कुणबी नोंदी सापडलेल्या लोकांना देवेंद्र फडणवीस मुद्दाम प्रमाणपत्र व्हेलिडिटी होऊ देऊन देत नाही. अधिकारी यांना सांगून काही तरी त्रुटी काढून देऊ नका, असे फडणवीस यांना सांगत आहेत.'
'देवेंद्र फडणवीस व छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला तर यांना रस्त्याला फिरू देणार नाही. फडणवीस तुम्हाला शेवटचा मोका देतोय, सुधरा, माजात आणि मस्तीत जगणे बंद करा. तुम्ही मराठा आरक्षणाबद्दल वाईट पावले उचलत आहात, आता मराठे शांत बसणार नाही. दंगली घडवण्याचे तुमच्या डोक्यातून काढून टाका. देवेंद्र फडवणीस हे गुप्तपणे डाव टाकत आहे असे मला मंत्री अधिकारी सांगतात,' असा आरोपही जरांगे पाटलांनी केला.