जालना : मराठा आरक्षणासाठी गेल्या पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीत अमरण उपोषण सुरू आहे. पण, आता जरांगे पाटलांनी आपले उपोषण थांबवण्याची घोषणा केली आहे. उद्या दुपारी, जरांगे पाटील आपले उपोषण मागे घेणार आहेत. 'धनंजय देशमुखांच्या डोळ्यात दिसत होते की, संतोष भैयाचे मॅटर मागे पडू नये. त्यामुळे उपोषणाची लढाई इथून पुढे बंद राहील,' असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे मंगळवारी रात्री त्यांना सलाईन लावण्यात आले होते. अंतरवाली सराटीत सुरु असलेले उपोषण थांबवण्याचा निर्णय जरांगेंनी घेतलेला आहे. संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण तापलेले आहे, त्यावरुन लक्ष हटू नये म्हणून उपोषण सोडत असल्याचा निर्णय जरांगेंनी घेतला आहे. 'मी आता उपोषण करणार नाही. पण आता झक पक आंदोलन करणार. उद्या उपोषणकर्त्यांशी मी सकाळी बोलतो आणि पुढे काय करायचे, ते ठरवतो.'
'एक गोष्ट चांगली झाली, आमचे आणि मराठा समाजाचे डोळे उघडले. खरा आरक्षणाचा मारेकरी कोण, हे लोकांना कळले पाहिजे. हा माणूस जाणूनबुजून काम करत नाही. आजवर मी फडणवीस यांच्याबद्दल बोललो नाही, पण लपवाछपवी सुरू आहे. आम्हाला वेड्यात काढायचे काम सुरू आहे. फडणवीस तुम्ही बेइमानी केली. जे आमच्या हक्काचे आहे, ते देत नाहीत. फडणवीस गप्प बसलेत, याचा अर्थ त्यांच्या मनात मराठ्या विषयी किती द्वेष आहे, हे कळले.'
'देवेंद्र फडवणीस यांनी मराठ्यांचे मने जिंकायला पाहिजे होते. मराठ्यांनी आता सावध व्हावे, मुला-बाळांचे वाटोळे होऊ देऊ नका. पावणे दोन वर्षे आंदोलन केली, आता झक पक आंदोलन करणार. फडणवीस साहेब, आता आनंद लय दिवस राहणार नाही, आनंदावर विरजन पडेल. ज्या दिवशी बोलायचे त्या दिवशी तुम्हाला सांगे. खरी चूक कोणाची आहे हे मराठा समाजाला कळाले आहे. बेईमानी आणि गद्दारी फडणवीस यांच्याकडून होईल असे वाटले नव्हते. आता आमच्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू,' असा इशाराही जरांगे पाटलांनी यावेळी दिला.