लोकमत न्यूज नेटवर्क, वडीगोद्री (जि. जालना) : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी यासह इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी पुन्हा अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. हे त्यांचे सातवे उपोषण असून, सरकार मराठा समाजाच्या मागण्या मान्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जरांगे पाटील म्हणाले, सगेसोयरेचा अध्यादेश काढून २६ जानेवारीला एक वर्ष होत आहे. परंतु, अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. आजवर कधी झाले नाही ते मराठ्यांच्या बाबतीत घडत आहे. त्यामुळे आपण पुन्हा उपोषण सुरू केले आहे. मराठ्यांना ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र द्यावे, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढावा, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीने करावी, अशा मागण्या त्यांनी केल्या. यावेळी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.