टेंभुर्णी (जालना) : जाफराबाद तालुक्यात टेंभुर्णी ते राजूर रस्त्यावर एका भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (२९ ऑगस्ट) पहाटे ५ ते ६ च्या सुमारास भरधाव वेगाने येणारी एक कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली. या अपघातापूर्वी कारने मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोघांनाही धडक दिली, ज्यात एक गंभीर जखमी झाला आहे. तर कारमधील चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
नेमकं काय घडलं?टेंभुर्णीजवळ गाढेगव्हाण गावाजवळ हा अपघात घडला. वेगाने येणाऱ्या कारने रस्त्यावर मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन व्यक्तींना धडक दिली. या धडकेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जालना येथे हलवण्यात आले आहे. दुसऱ्या व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतातील विहिरीत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. क्रेनच्या साहाय्याने कार विहिरीतून बाहेर काढण्यात आली. कार धडकेत गंभीर जखमीचे नाव भगवान साळुबा बनकर (५५) असे आहे.
बचावकार्यात आढळले चार मृतदेहविहिरीतून कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, त्यात चार व्यक्तींचे मृतदेह आढळले आहेत. मृतांमध्ये ज्ञानेश्वर भाऊसाहेब डकले, निर्मला सोपान डकले, ( गेवराई गुंगी )पद्माबाई लक्ष्मण भामिरे, ज्ञानेश्वर लक्ष्मण भामिरे, ( कोपर्डा) यांचा समावेश आहे. सर्वजण कारने सुलतानपूर येथे रुग्णाला उपचारासाठी घेऊन जात असल्याची माहिती आहे. आतापर्यंत एक मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
रोड शेजारील विहिरींचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवरदरम्यान जिल्ह्यात अनेक ठिकाणी रोड शेजारी असलेल्या विहिरींचा विषय या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही जामवाडी जवळ अशाच घटनेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. अशा विहिरींचा शोध घेऊन त्यांना उंच वॉल कंपाऊंड करणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाने वेळीच पाऊल उचलले पाहिजे नसता भविष्यात आणखी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही