जालना: सोमवारी (दि. १५) रात्री जालना शहरासह परिसरात विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. रात्रभर सुरू असलेल्या पावसाने शहरातील सीना-कुंडलिका नद्यांना पूर आल्याने अनेक सखल भागांत पाणी शिरले. यामुळे नागरिकांना रात्रभर जागून काढावी लागली, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले.
रात्रभर पाऊस सुरूचसोमवारी दुपारी ४ वाजल्यापासूनच शहरात पावसाला सुरुवात झाली होती. रात्री १० वाजेपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. मात्र, रात्री १० नंतर पावसाने रौद्र रूप धारण केले. विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या जोरदार पावसाने मंगळवारी पहाटेपर्यंत विश्रांती घेतली नाही. या अनपेक्षित पावसामुळे शहराच्या अनेक भागांत मध्यरात्रीनंतर वीजपुरवठा खंडित झाला होता.
नद्यांना पूर, अनेक भाग पाण्याखालीया जोरदार पावसामुळे शहराच्या मध्यातून वाहणाऱ्या सीना-कुंडलिका नद्यांना पूर आला. मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास कुंडलिका नदीचे पाणी पुलावरून वाहू लागले. लक्कडकोट, राजमल टाकी आणि बस स्थानकाजवळील पुलांवरून पुराचे पाणी वाहत होते. यामुळे लक्कडकोट परिसरातील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले.
राजकीय नेत्यांच्या निवासस्थानांनाही फटकाशहरातील भाग्यनगर भागात, जिथे आमदार अर्जुन खोतकर आणि माजी आमदार राजेश टोपे यांचे निवासस्थान आहे, तिथेही पाणी साचले होते. मंमादेवी ते रेल्वे स्थानक मार्गावरील अनेक हॉटेल्स आणि दुकानांमध्येही पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचबरोबर शहरातील गुरु भवन आणि बस स्थानक परिसरही पाण्याखाली गेला होता. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे.
जनजीवनावर मोठा परिणामसध्या सीना-कुंडलिका नदीचा पूर ओसरला असला तरी, दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अचानक आलेल्या या पावसाने जालना शहराच्या जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक प्रशासन नुकसानीचा अंदाज घेत असून मदतकार्य सुरू करण्याची तयारी करत आहे.