अंबड/वडीगोद्री : संशयित दुचाकी चोरीमधील आरोपी पकडण्यासाठी गेलेल्या गोंदी पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज, शनिवारी सकाळी ११ वाजता पाचपिंपळतांडा येथे घडली. यावेळी झालेल्या दगडफेकीत पोलीस उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शहागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल करण्यात आले होते.
अबंड तालुक्यातील गोंदी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक किरण हावले, जमादार अशोक नागरगोजे, जमादार चरणसिंग बामणवात, कर्मचारी शाकेर सिद्दिकी हे शनिवारी सकाळी ११ वाजता गोंदी शिवारातील पाचपिंपळतांडा येथे दुचाकी चोरीतील आरोपी शोधण्यासाठी गेले होते. संशयित आरोपीला राहत्या घरातून पकडत असताना पोलिसांवर दोन पुरुष व एक महिला यांनी दगडफेक सुरू केली. यात पोलिस कर्मचारी जखमी झाले. संशयित आरोपी आणि हल्लेखोर फरार झाले आहेत. याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात पुढील प्रक्रिया सुरू असून हल्लेखोरांचा तपास सुरू आहे. दरम्यान, माहिती कळताच घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे, गोंदीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, तीर्थपुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद अहेमद यांनी भेट दिली.
पोलिस अधिकारी, कर्मचारी जखमीयावेळी पोलिस कर्मचारी शाकेर सिद्दिकी यांना डाव्या हाताल दगड लागला तर अशोक नागरगोजे यांच्या पायाला दगड लागला. तसेच या दरम्यान पोलिस उपनिरीक्षक किरण हावले यांच्या कारवर (एम.एच.25 बी.ए.2226) तिघांनी दगडफेक केली. यात कारची मागील काच फुटली. या हल्ल्यात जखमी पोलिसांवर शहागड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे.