जालना : कोरोनाच्या प्रादुर्भावात दहावी- बारावीच्या परीक्षा झाल्या नाहीत; परंतु गुणदानानंतर सतत अभ्यास करणाऱ्या काही मुलांना कमी गुण पडल्याची ओरड होत आहे. तसेच अभ्यास न करणाऱ्या काहींना अधिक गुण पडल्याची खंत मुले करीत आहेत.
यापूर्वी लेखी परीक्षा झाल्यानंतर गुणदान केले जात होते. त्यात गुण कमी पडले किंवा नापास झाल्यानंतर पुनर्मूल्यांकनाची सुविधा होती. या प्रक्रियेतून मुलांच्या शंकांचे निरसन केले जात होते.
परीक्षा नाही, पुनर्मूल्यांकनही नाही
यापूर्वी परीक्षेनंतर एखादा मुलगा नापास झाला किंवा मार्क कमी पडले असे वाटले तर पुनर्मूल्यांकनाचा पर्याय होता.
शासकीय फी भरल्यानंतर त्याला उत्तर पत्रिकेच्या झेरॉक्स व पुनर्मूल्यांकनाचे मार्क मिळत होते.
यंदा परीक्षाच न झाल्याने पुनर्मूल्यांकन होण्याची चिन्हे नाहीत. तरीही शासन याची संधी देणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
मी त्याच्यापेक्षा हुशार, मग त्याला माझ्यापेक्षा जास्त गुण कसे?
पहिलीपासून ते दहावी- बारावीपर्यंत अनेक मुले-मुली एकत्रित शिक्षण घेतात. अनेक मुले नेहमी अभ्यासात इतर मित्रांपेक्षा पुढे असतात.
कोरोनात परीक्षा न झाल्याचा फायदा अभ्यास न करणाऱ्या काही मुलांना झाला. मात्र, अभ्यास करूनही अपेक्षित मार्क न मिळाल्याच्याही तक्रारी आहेत.
मी इतका अभ्यास केलेला असताना आणि इतरांपेक्षा हुशार असताना कमी मार्क मिळाल्याची नाराजीही काही मुले, मुली व्यक्त करताना दिसतात.
निकालावर नाराज असलेले पालक म्हणाले...
कोरोना महामारीमुळे नियमित वर्ग झाले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात शिक्षण घेता आले नाही. तीन वर्षांच्या सरासरी मूल्यमापनामुळे यंदा हुशार विद्यार्थी, नियमित तासिका आणि अभ्यास करणाऱ्या मुलांचे नुकसान झाले.
- राजेंद्र मोरे, पालक
यंदा बोर्डाच्या परीक्षेत मिळालेले गुण केवळ व्हर्च्युअल समाधान आहे. ही मूल्यांकन पद्धत योग्य नाही. प्रत्यक्ष परीक्षेच्या अनुभूती परीक्षार्थींना येत नाही. पुढील काळात होणाऱ्या परीक्षा यामुळे अवघड जातील.
- के. एन. सोळुंके, पालक
विद्यार्थी म्हणतात...
ऑनलाइन शिक्षणामुळे प्रत्यक्ष शिक्षण अनुभूतीची उणीव भासत होती. आम्ही नियमित अभ्यास केला; परंतु आम्हाला चर्चात्मक अभ्यासाला वाव मिळाला नाही. कोरोनामुळे झालेल्या मूल्यमापनामुळे गुणवत्तेवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
- अदिती जाधव, विद्यार्थिनी
कोरोनामुळे परीक्षा न झाल्याने मला याचा फटका बसला. मी ९० टक्क्यांपर्यंत जाऊ शकले असते; पण मला ७६ टक्केवारीत समाधान मानावे लागत आहे. सरासरीवरून मूल्यमापन योग्य नाही. नेहमीप्रमाणे प्रत्यक्षात परीक्षा झाल्या असत्या तर चित्र वेगळे दिसले असते.
- अमृता राखुंडे, विद्यार्थिनी