जालना : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका कंटेनरवर कारवाई करून ७७ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. २५ लाखांच्या कंटेनरसह गुटखा असा एक कोटी दोन लाख ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी पहाटे कडवंची शिवारातील समृद्धी महामार्गावर करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी पहाटे समृद्धी महामार्गावर गस्तीवर होते. त्यावेळी मेहकरकडून छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव जाणाऱ्या एका कंटेनरला थांबवून तपासणी केली. प्रारंभी चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्यास विश्वासात घेवून विचारपूस केली असता आतमध्ये गुटखा असल्याचे त्याने सांगितले. तपासणीनंतर कंटेनरमध्ये ७७ लाख ११ हजार २०० रुपयांचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी गुटख्यासह २५ लाखांचा कंटेनर असा एकूण एक कोटी दोन लाख ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात कंटेनरचालक इरफान रहीम सय्यद (वय ३६, रा. पुंडलिकनगर हुसेन कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) याच्यासह तिघांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पो.नि. पंकज जाधव, स.पो.नि. योगेश उबाळे, हवालदार सॅम्युअल कांबळे, राम पव्हरे, प्रशांत लोखंडे, सागर बाविस्कर, योगेश सहाणे, धीरज भोसले, सोपान क्षीरसागर, चालक सौरभ मुळे आदींच्या पथकाने केली.