'MPSC'साठी एक वर्ष वाढवून मिळाले; विद्यार्थी म्हणतात आणखी एक वर्ष वाढवा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 02:43 PM2021-11-18T14:43:34+5:302021-11-18T14:45:35+5:30

MPSC Age Extension: दोन वर्षे वाया गेलेले असताना एकच वर्ष मुदतवाढ का, असा प्रश्न काही विद्यार्थी उपस्थित करीत आहेत.

Got one year extension for MPSC; Students say extend one more year ... | 'MPSC'साठी एक वर्ष वाढवून मिळाले; विद्यार्थी म्हणतात आणखी एक वर्ष वाढवा...

'MPSC'साठी एक वर्ष वाढवून मिळाले; विद्यार्थी म्हणतात आणखी एक वर्ष वाढवा...

googlenewsNext

जालना : कोरोनामुळे एमपीएससीच्या (MPSC ) परीक्षेत अडथळे आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने एमपीएससीची परीक्षा देणाऱ्यांच्या वयात सुट दिली आहे. काही विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले; परंतु दोन वर्षे वाया गेलेले असताना (MPSC Age Extension ) केवळ एक वर्षाची मुदतवाढ दिल्याने विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून काम करण्याचे स्वप्न पाहणारे हजारो विद्यार्थी एमपीएससी परीक्षेची तयारी करीत आहेत. कोणी खासगी क्लासेस लावून, तर कोणी घरी राहून अभ्यास करीत आहेत; परंतु कोरोनामुळे एमपीएससीच्या जाहिराती निघाल्या नाहीत. जाहिराती निघत नसल्या तरी आज ना उद्या जाहिरात निघेल या आशेवर मुला- मुलींनी परीक्षेची तयारी केली आहे. त्यावर हजारो रुपयांचा खर्चही दोन वर्षांत झाला आहे; परंतु कोरोनातील दोन वर्षे वाया गेल्याने अनेक मुलांचे वय निघून गेले. ही बाब पाहता शासनाने एक वर्ष मुदतवाढ दिली आहे; परंतु दोन वर्षे वाया गेलेले असताना एकच वर्ष मुदतवाढ का, असा प्रश्न काही विद्यार्थी उपस्थित करीत आहेत.

खुल्या प्रवर्गातील उमेदवार : वयाची अट ३८ वरून ३९ वर्षे
मागासवर्गीय उमेदवार : वयाची अट ४३ वरून ४४ वर्षे

दोन वर्षांपासून परीक्षा नाही
मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात झाला आहे. त्यामुळे शालेय स्तरावरीलही परीक्षा झालेल्या नाहीत. कोरोनामुळे एमपीएससीच्या परीक्षाही घेण्यात आलेल्या नाहीत. परीक्षा होत नसल्या तरी मुलांची तयारी सुरूच आहे. वाया गेलेली दोन वर्षे पाहता शासनाने किमान दोन वर्षे वय वाढवून द्यावे, असा सूर विद्यार्थ्यांमधून निघत आहे.

विद्यार्थी काय म्हणतात...

मी मागील अनेक वर्षांपासून एमपीएससीची तयारी करीत आहे; परंतु मागील दोन वर्षे कोरोनात गेले. आता माझे वय ३८ आहे. त्यामुळे केवळ एका वर्षाची सूट मिळणार आहे. दोन वर्षे वाया गेल्याने वाढीव दोन वर्षे मिळावीत.
-सुवर्णा तायडे, विद्यार्थिनी

मी एमपीएससीच्या परीक्षेची तयारी अनेक वर्षांपासून करीत आहे. कधी घरी राहून तर कधी क्लासेस जॉइन करून तयारी केली आहे; परंतु कोरोनामुळे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून निघण्यासाठी परीक्षेतील वयात आणखी सूट द्यावी.
-गणेश दहेकर

कोरोनाच्या कालावधीत परीक्षेच्या अभ्यासावर परिणाम होऊ दिला नाही. आम्ही सातत्याने एमपीएससी परीक्षेचा अभ्यास केला आहे. परीक्षा न झाल्याने मुलेही नाराज झाली आहेत. मुलांच्या भविष्याचा विचार करून वयात आणखी सुट द्यावी.
-अनुराग खेडेकर

Web Title: Got one year extension for MPSC; Students say extend one more year ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.