लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथील एका शेतकयाच्या शेतातील घराला लागलेल्या आगीत ९ लाखाचे नुकसान झाले आहे. दरम्यान शेजारी शेतकरी व ग्रामस्थ मदतीला धावल्याने ही आग आटोक्यात आली.येथील भिका लक्ष्मण माने यांचा परिवार शेतात वास्तव्यास आहे. बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरातील मागील बाजूने अचानक आगीचे लोळ उठताना दिसले. प्रसंगावधान राखून माने यांच्या घरातील सर्व सदस्य बाहेर पळाले. त्यांनी आरडाओरडा केला परंतु तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. शेजारी व गावातील ग्रामस्थ मदतीला धावले. सर्वांनी मिळून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत या आगीत घरातील नगदी १ लाख रुपयांसह घरातील कापूस, ज्वारी, गहू आदी शेतमाल, विद्युत मोटारी, इंजिन व घरोपयोगी सर्व साहित्य, एक वासरु जळून खाक झाले.या आगीत अंदाजे ८ लाखांचे साहित्य जळाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान आग विझवताना पिंपळे यांचा मुलगा जीवन पिंपळे हा सुद्धा आगीने पोळून जखमी झाला आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांनी जिकिरीचे प्रयत्न केले. आगीचे कारण कळू शकले नाही.ऐन दुष्काळात दिवाळीच्या तोंडावर या शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढवल्याने त्यांचा परिवार हवालदिल झाला आहे.दरम्यान या घटनेचा गुरूवारी तलाठी भोरे यांनी पंचनामा करून वरिष्ठांना अहवाल पाठविला आहे.
डोणगावात घराला आग; ९ लाख रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:24 IST