लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : शासनाच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे समाजातील विविध घटकांच्या जातीय आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी अंबड येथील मत्स्योदरी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात केले.मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी खा. स्व. अंकुशराव टोपे यांचा अर्धाकृती पुतळा अनावरण व मत्स्योदरी महाविद्यालयाच्या विज्ञान भवन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात आ. पाटील बोलत होते.पुढे बोलताना प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, मागील दोन दशकांमध्ये शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढले आहे, लोकसंख्येच्या प्रमाणात सुशिक्षितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. साहजिकच शिक्षित तरूण नोकरीच्या शोधात असतात. परंतू, सरकारी ऐवजी खाजगीमध्ये नोकरीच्या संधी उलपब्ध आहेत. त्यामुळे तेथे मिळेल ती नोकरी करण्याकडे बेरोजगारांचा कल असतो. दरम्यान, सरकारी नोकरी मिळावी यासाठी देखील सुशिक्षित बेरोज गारांकडून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तयारी केली जाते. परंतू, आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यावर त्यांचा हिरमोड होतो. सध्या, आरक्षणाच्या मागणीवरून महाराष्ट्रासह देशात वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या जातींकडून आरक्षणाची मागणी केली जात आहे. परंतु ही मागणी पूर्ण करतांना आर्थिक घडी विस्कटलेली असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जगभरातील कोणत्याही क्षेत्रात ज्ञानी व्यक्तीसाठी संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी तुमच्याकडे ती पात्रता असणे आवश्यक असल्याचे आ. जयंत पाटील यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेश टोपे यांनीही सविस्तर विचार मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, माजी आ. चंद्रकांत दानवे, उत्तम पवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश टोपे, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोज मरकड, जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख यांच्यासह रा. काँ. कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारची आर्थिक घडी विस्कटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 01:11 IST