- श्याम पुंगळेराजूर : भोकरदन तालुक्यातील लोणगाव परिसरात महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर रताळी काढणीला वेग आला आहे. १५ फेब्रुवारी रोजी उपवासाच्या दिवसांत फराळासाठी रताळ्याला मोठी मागणी असल्याने शेतकऱ्यांनी सध्या काढणीवर भर दिला आहे. यंदा समाधानकारक पावसामुळे उत्पादन चांगले झाले असून, रताळी शेती शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरत आहे.
लोणगाव येथील बहुतांश शेतकरी १ ते ५ एकरपर्यंत रताळ्याची लागवड करतात. विशेष म्हणजे, अल्पभूधारक शेतकरीही किमान १० गुंठ्यांत रताळी पीक घेत असून, त्यातून लाखोंचे उत्पन्न मिळत असल्याचे चित्र आहे. यंदा शेतकरी ओंकारसिंह शेखावत यांनी ५ एकरात रताळीचे पीक घेऊन १० लाखांचा निव्वळ नफा होण्याची शक्यता वर्तविली आहे. सध्या मजुरांच्या साह्याने रताळी काढण्याचे काम सुरू असून, एकरी २५० क्विंटल उत्पादन निघत असल्याचे शेखावत यांनी सांगितले. लागवडीपासून ते काढणीपर्यंत केवळ एकरी ६० ते ७० हजार रुपये खर्च येत असल्याचे त्यांनी सांगितले.
रताळी हे आरोग्याच्या दृष्टीने पोषक पीक असून, महाशिवरात्रीसारख्या उपवासाच्या दिवशी त्याला मोठी मागणी असते. त्यामुळे शेतकरी जुलै महिन्यात लागवड करून महाशिवरात्रीपूर्वी काढणी करतात. हे पीक कमी खर्चात, कमी कालावधीत तसेच हलक्या प्रतीच्या जमिनीतही चांगले येत असल्याने शेतकऱ्यांचा याकडे कल वाढला आहे.
सध्या गावात ट्रॅक्टर तसेच बैलजोडीच्या साह्याने रताळी काढणी सुरू असून, काढलेली रताळी पोत्यांमध्ये भरून विक्रीसाठी तयार केली जात आहेत. महाशिवरात्री जवळ आल्याने जालना, अहिल्यानगर, केज, धारूर तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन ठोक भावाने खरेदी करत आहेत. काही शेतकरी मात्र स्वतः बाजारपेठेत जाऊन किरकोळ विक्री करत असल्याचेही दिसून येत आहे. यंदा दोन हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळणार असल्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
काढणीचे काम अंतिम टप्प्यातदरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही पाच एकर क्षेत्रात रताळ्याची लागवड केली आहे. सध्या रताळी काढणीचे काम अंतिम टप्प्यात असून, एकरी सुमारे २५० क्विंटल उत्पादन मिळत आहे. समाधानकारक पाऊस व योग्य मशागतीमुळे पीक चांगले आले आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर बाजारात मागणी वाढली असून, यंदा रताळी विक्रीतून किमान १० लाख रुपयांचे उत्पन्न होण्याचा अंदाज आहे.- ओंकारसिंह शेखावत, शेतकरी
या परिसरात घेतात रताळीचे पिकपूर्वी केवळ लोणगाव येथील शेतकरी रताळ्याची लागवड करीत होते. मात्र, या पिकातून कमी खर्चात अधिक उत्पादन व चांगले उत्पन्न मिळत असल्याने आता परिसरातील उंबरखेड, डोणगाव, राजूर, तपोवन आदी गावांतील शेतकऱ्यांनीही रताळी लागवडीकडे वळणे सुरू केले आहे. रताळी हे पीक हलक्या जमिनीतही उत्तम येते तसेच कमी कालावधीत काढणीस येत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळत आहे. महाशिवरात्रीसारख्या उपवासाच्या दिवसांत रताळ्याला मोठी मागणी असल्याने या पिकास बाजारभावही समाधानकारक मिळत आहे. त्यामुळे रताळी शेती ही परिसरातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असून भविष्यात याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.
Web Summary : Farmer Omkarsingh Shekhawat earned ₹10 lakh from 5 acres of sweet potatoes due to high Mahashivratri demand. Low cost, quick harvest sweet potatoes are increasingly popular in Lonagaon, bringing financial stability to farmers.
Web Summary : महाशिवरात्रि की मांग से किसान ओंकारसिंह शेखावत ने 5 एकड़ शकरकंद से ₹10 लाख कमाए। कम लागत, जल्दी कटाई वाली शकरकंद लोनागाँव में तेजी से लोकप्रिय है, जिससे किसानों को वित्तीय स्थिरता मिल रही है।