लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामामुळे बसस्थानक परिसरात मातीच माती झाली आहे. यामुळे बसस्थानक परिसरात धुळीचे लोट उठत असल्याने पाणी मारण्याची मागणी प्रवाशांमधून होत अहे.आठ दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम करणारी खासगी आयआरबी कंपनीने बसस्थानक समोरील शंभर मीटरपर्यंत सर्व्हिस रस्त्याचे काम अर्धवट सोडले आहे. या रस्त्यावरून वाहतूक सुरू झाली असल्याने बसस्थानकात व परिसरात धुळीचे लोटचे लोट उडत आहेत. यामुळे बसच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना तसेच परिसरातील व्यावसायिकांना याचा त्रास सहन करावा लागत असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.बसस्थानकासमोरील सर्व्हिस रस्ता, उड्डाणपुलाखालून असल्याने या रस्त्यावर नियमित वर्दळ राहत आहे. या मार्गावरून खाजगी वाहनांसह महामार्गाचे काम करणारी अवजड वाहने रात्रंदिवस धावत आहेत. यामुळे मोठमोठे धुळीचे लोट सतत उडतात. या लोटांमुळे नागरिकांना श्वसनाशी संबंधित आजार बळकावण्याची शक्यता परिसरातील नागरिकांमधून वर्तवली जात आहे.या सर्व्हिस रस्त्याचे काम महामार्गाचे काम करणारी खासगी आयआरबी कंपनी करत आहे. मात्र, आठ दिवसांपूर्वी सर्व्हिस रस्ता अर्ध्यावर सोडून कंपनीने दुसरे काम हाती घेतले आहे. यामुळे अर्धवट राहिलेल्या या सर्व्हिस रस्त्याचे काम करावे, अन्यथा कच्च्या रस्त्यावर दररोज पाणी मारावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
बसस्थानक परिसरात धुळीचे लोट; प्रवाशांचे हाल...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:38 IST