पारडगाव : सध्या एकीकडे थंडीचा कडाका वाढला आहे, तर दुसरीकडे ग्रामपंचायत निवडणुकीचा आखाडा तापू लागला आहे. अशा वातावरणात गावागावात गरम चहासोबत ग्रामपंचायत निवडणुकांच्या चर्चेचे फड रंगू लागले आहेत. विशेषत: या निवडणुकीत इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून, पॅनलमधील उमेदवार अंतिम करताना गाव पुढाऱ्यांची चांगलीच धावपळ होत आहे.
घनसावंगी तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. गावपुढारी आपापले पॅनल अंतिम करण्यात व्यस्त असून, इच्छुकांची मनधरणीही सुरू आहे. सध्या कागदपत्रांसाठी अनेकांच्या सरकारी कार्यालयात चकरा वाढल्या आहेत. तालुक्यात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी पॅनल तसेच राष्ट्रवादी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी पॅनल असा सामना रंगणार असल्याचे चित्र आहे. भाजपने मात्र अनेक ठिकाणी एकला चलो रेची भूमिका घेतली आहे. यंदाच्या निवडणुकीत युवा वर्गही मागे राहिलेला नाही. त्यामुळे गावातील राजकीय आखाडे सध्या पेटले आहेत. युवकांची संख्या वाढल्याने गावातील नेतेमंडळींची डोकेदुखी वाढली आहे. युवकांना पॅनलमध्ये घ्यावे तर जुने नाराज आणि जुन्यांना डावलावे तर युवक नाराज अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे यातून चांगला मार्ग निघावा, बंडखोरी होऊ नये, याचीही दक्षता पॅनलप्रमुख घेत असल्याचे चित्र आहे.