टेंभुर्णी (जि. जालना) : जाफराबाद तालुक्यातील बुटखेडा येथील रतन श्रीराम नागवे (वय ५२) या वारकऱ्याचे दिंडीतच निधन झाले. सावळ्याच्या दर्शनापूर्वीच या वारकऱ्याने शेवटचा विसावा घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रतन नागवे हे मागील २५ वर्षांपासून पंढरीची पायी वारी करायचे. ते दरवर्षी तुकाराम महाराज यांच्या पालखीसोबत देहू ते पंढरपूर दिंडीत सहभागी होत असत. यावर्षीही गावातील चार वारकऱ्यांसह रतन नागवे हे तुकाराम महाराजांच्या दिंडीत ‘विठ्ठल विठ्ठल’च्या गजरात पंढरपूरकडे निघाले होते. मात्र, पंढरपूरपासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर असताना वाटेतच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे अकलूज येथे १ जुलैला निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुटखेडा येथे बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
संघर्षातून उभे केले कुटुंबमयत वारकरी रतन श्रीराम नागवे हे मूळचे भोकरदन तालुक्यातील खामखेडा येथील रहिवासी होत. त्यांचे वडील कित्येक वर्षांपूर्वी बुटखेडा येथे आल्याने ते येथेच स्थायिक झाले होते. अतिशय संघर्षातून रतन नागवे यांनी आपल्या परिवाराला उभे केले. स्वकष्टावर त्यांनी बुटखेडा येथे शेती घेऊन आपली कौटुंबिक स्थिती सुधारली होती. त्यांच्या पश्चात येथील देवीच्या मंदिरात पुजारी असलेल्या आई, पत्नी, दोन मुले, एक भाऊ असा परिवार आहे.