सिडको तर पाहिजे, पण पाणी नाही देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 01:13 AM2018-05-18T01:13:01+5:302018-05-18T01:13:01+5:30

जालन्यात सिडको प्रकल्प व्हायला हवा, परंतु जायकवाडी योजनेतून या प्रकल्पास पाणी देण्यास नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी तीव्र विरोध केला.

Cidco should be, but we will not give water | सिडको तर पाहिजे, पण पाणी नाही देणार

सिडको तर पाहिजे, पण पाणी नाही देणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालन्यात सिडको प्रकल्प व्हायला हवा, परंतु जायकवाडी योजनेतून या प्रकल्पास पाणी देण्यास नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी तीव्र विरोध केला. पालिकेच्या मोकळ्या जागांवर बीओटी तत्त्वार शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणीच्या ठरावासह अंतर्गत जलवाहिनी कामाच्या गुणवत्तेबाबत सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेकडकर सभागृहात गुरुवारी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्यासह सदस्यांची सभागृहात उपस्थिती होती. सभेच्या सुरुवातीलाच सर्वपक्षीय सदस्यांनी शहरात विस्कळित झालेल्या पाणीपुरवठ्याच्या मुद्द्यावर मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले. जुना जालन्यात अनेक किती दिवसाआड पाणीपुरवठा होतो, याबाबत खुलासा करण्याची मागणी शहाआलम खान, रफिया बेगम यांनी केली. नवीन जलकुंभ उभारणीचे कामे अपूर्ण असतानाही कंत्राटदारास लाखो रुपयांची देयके कशी दिली जातात, याचा खुलासा करण्याची मागणी विष्णू पाचफुले, महावीर ढक्का, ज्ञानेश्वर ढोबळे, शशिकांत घुगे, गणेश राऊत यांनी केली. जलकुंभांची उभारणी करून प्रत्यक्ष नळजोडण्या दिल्या जात नाही तोपर्यंत देयके अदा न करण्याचा, तसेच योजनेचे काम गुणवत्ता व्हावे यासाठी समिती नेमण्याचा ठराव घेण्याची मागणी या सदस्यांनी केली. जलवाहिनीचे काम मोठे असल्याने, तसा निर्णय घेणे योग्य होणार नाही, असे मुख्याधिका-यांनी स्पष्ट केले. जलकुंभाचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी शहरातील वाढते अतिक्रमण व वाहतुकीचा मुद्दा उपस्थित केला. सिडको प्रकल्पास पाणी देण्याच्या ठरावास सर्वपक्षीय सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. सिडको सारखा चांगला प्रकल्प जालन्यात व्हायला हवा. मात्र, जायकवाडी योजनेतून शहराला अगोदरच कमी पाणीपुरवठा होत आहे. शहराची पाण्याची गरज भागात नसेल तर या प्रकल्पास पाणी देवू नये. अंबड नगरपालिकेचे पाणी बंद करावे, अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली. जायकवाडी योजनेची क्षमता, प्रत्यक्ष येणारे पाणी व सिडको प्रल्पास लागणारे पाणी याबाबत माहिती देण्याची मागणीही सदस्यांनी केली. अभियंता रत्नाकर अडसिरे यांनी दिलेल्या माहितीवर सदस्यांचे समाधान झाले नाही. अग्निशमन दल व जुन्या सेंट्रल नाक्यावर बीओटीवर कॉम्प्लेक्स बांधण्याच्या ठरावास सभागृहात विरोध झाला. बीओटीचा पूर्वानुभव चांगला नसल्याने मोक्याच्या जागा व्यावसायिकांच्या घशात का घालता, असा सवाल विष्णू पाचफुले, अशोक पांगारकर, महावीर ढक्का यांनी उपस्थित केला. बीओटीवर कॉम्प्लेक्स उभारणीमुळे पालिकेला उत्पन्न मिळेल, रोजगार वाढेल, असे उपनगराध्यक्ष राऊत यांनी सभागृहात सांगितले. विशिष्ट नगरसेवकांच्या कामांनाच तांत्रिक मान्यता देण्याच्या मुद्द्यासह अखर्चित निधीबाबत सदस्य ज्ञानेश्वर ढोबळे, शशिकांत घुगे, अशोक पांगारकर यांनी मुख्याधिका-यांना धारेवर धरले.
सदस्य विनोद रत्नपारखे, विजय चौधरी, चंपालाल भगत, अशोक मगरे, शेख शकील, नजीब लोहार, विजय पवार, जीवन सले यांनी सभागृहातील चर्चेत सहभाग घेतला.
लोकमतच्या वृत्तावर सभागृहात वादळी चर्चा
सभागृहात विष्णू पाचफुले यांनी लोकमतमध्ये प्रसिद्ध ‘बांधकाम विभागात संचिकांचा ढीग’ या वृत्ताच्या आधारे मुख्याधिका-यांना जाब विचारला. मोतीतलाव परिसरात विहीर खोदून पाणी वापर होत असल्याच्या लोकमतने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताबाबत खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली. विजय चौधरी यांनीही याच मुद्द्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. पाणीचोरीबाबत पथकाकडून कारवाई केली जाईल, असे मुख्याधिका-यांनी सांगितले.

Web Title: Cidco should be, but we will not give water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.