बालकांनो आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी जिद्दीने अभ्यास करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:21 AM2021-06-17T04:21:12+5:302021-06-17T04:21:12+5:30

जिल्हाधिकारी बिनवडे : शासकीय निरीक्षण व बालगृहाला भेट जालना : बालगृहातील प्रत्येक बालकाच्या संरक्षणाबरोबरच बालकांना त्यांच्या पाल्यांची ...

Children, study hard for your bright future | बालकांनो आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी जिद्दीने अभ्यास करा

बालकांनो आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी जिद्दीने अभ्यास करा

Next

जिल्हाधिकारी बिनवडे : शासकीय निरीक्षण व बालगृहाला भेट

जालना : बालगृहातील प्रत्येक बालकाच्या संरक्षणाबरोबरच बालकांना त्यांच्या पाल्यांची उणीव भासणार नाही, यादृष्टीने पालकांप्रमाणे त्यांची काळजी घेण्याचे निर्देश देत, शिक्षणामध्ये खूप मोठी ताकद असून, उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक बालकाने जिद्दीने व चिकाटीने अभ्यास करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे. जालना शहरातील शासकीय निरीक्षण व बालगृहाला जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी मंगळवारी अचानक भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंडळाचे प्रमुख न्यायदंडाधिकारी व्ही. एस. यादव, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संगीता लोंढे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, मानसोपचारतज्ज्ञ दीपाली मुळे, बालकल्याण समितीचे सदस्य डॉ. मनोहर बन्सवाल, शासकीय निरीक्षणगृहाचे अधीक्षक अमोल राठोड आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, या बालगृहासाठी कुठल्याही बाबींची कमतरता असेल, तर प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करावेत, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रत्येक बालकाच्या आरोग्याची काळजी घेण्यात यावी, बालकांना ताप, सर्दी, खोकला यांसारखी काही लक्षणे असतील तर तातडीने त्यांच्यावर उपचाराची सोय करावी. बालकांना या निरीक्षणगृहात देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा उत्तम ठेवण्याबरोबरच या निरीक्षणगृहातील प्रत्येक खोल्यांची तसेच परिसराची नियमितपणे स्वच्छता ठेवावी, असेही ते म्हणाले.

बालकांशी साधला संवाद

निरीक्षणगृहामधील बालकांशीही जिल्हाधिकारी बिनवडे यांनी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांची आस्थेने चौकशी करून या बालकांना बोलते केले. या निरीक्षणगृहामध्ये तुम्हाला वेळेवर जेवण दिले जाते का, जेवण चांगले असते का, तुमच्या आरोग्याची तपासणी नियमितपणे केली जाते का, तुम्हाला मोठे होऊन काय व्हायचे आहे, या जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत मायेने व आस्थेने विचारलेल्या प्रश्नांना बालकांनीही तेवढ्याच उत्स्फूर्तपणे उत्तरे दिली.

Web Title: Children, study hard for your bright future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.