जालना : आज विविध गुन्हेगारी कृत्यामुळे अल्पवयीन मुले आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहत आहेत. हाणामारीतील काही तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होतात. तर अनेक तक्रारींमध्ये पोलीस आपापसात समेट घडविला जातो. समेट घडविताना पोलिसांकडून मुलांसह पालकांचे समुपदेशन केले जाते. परंतु, विविध कारणांनी अल्पवयीन मुले आरोपी होण्याचे प्रकार सुरूच आहे.
स्पर्धेच्या युगात मुलांकडे लक्ष द्यायला पालकांकडे वेळ नाही. कोणी नोकरीला, कोणी मजुरीला तर कोणी इतर कामानिमित्त घरातून बाहेर असतो. कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी महिलाही आता नोकरी किंवा घरगुती व्यवसाय करू लागल्या आहेत. त्यामुळे मुले घराबाहेर गेल्यानंतर करतात तरी काय ? याचा थांगपत्ता अनेक पालकांना लागत नाही. एखादी घटना घडली आणि कोणी तक्रार घेऊन घरी आले तरच मुलांची भांडणे झाल्याचे पालकांना समजते. विशेषत: माध्यमिक, उच्च माध्यमिकचे शिक्षण घेणाऱ्या मुलांमध्ये हाणामारीचे प्रकार वाढले आहेत.
हाणामारीशिवाय घरफोड्यांसह इतर चोऱ्यांमध्येही लहान मुले आरोपी म्हणून आढळत आहेत. कायद्यानुसार अशा मुलांना न्यायालय बालसुधारगृहात पाठविते. परंतु, बालसुधारगृहातून बाहेर येणारी काही मुले नंतर गुन्हेगारी कृत्य करीत नाहीत. तर काही मुले पुन्हा गुन्हेगारी कृत्याकडे वळत असल्याचे पोलिसांसमोर येणाऱ्या काही घटनांवरून दिसून येते. समुपदेशनानंतरही बालगुन्हेगारी वाढत असल्याने पोलिसांसमोरही अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
बालमनावर मोठ्यांच्या चिडचिडेपणाचा परिणाम
आज अनेक मुलं हट्टी होत चालली आहेत. मुलांनी एखादी वस्तू मागितली आणि ती नाही मिळाली तर त्यांच्यातील चिडचिडेपणा वाढतो किंवा एखाद्या गोष्टीवरून पालक सतत त्यांना विचारणा करीत असतील तर त्या बालमनावरही मोठा परिणाम होतो. त्यामुळे त्यांचा चिडचिडेपणा, राग वाढू वाढू लागतो. घराबाहेर पडणारी ही मुलं आपल्या रागाच्या भरात भांडण-तंटे करू लागतात. मुलांना अशा कृत्यापासून दूर ठेवण्यासाठी पालकांची भूमिका महत्त्वाची आहे.
कायद्यातील तरतुदी
एखाद्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलगा, मुलगी आढळून आली तर पोलीस त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करतात. न्यायालयही त्यांची बालसुधारगृहात रवानगी करते. बालसुधारगृहात तज्ज्ञांमाफर्त मुलांचे समुपदेशन करून त्यांना गुन्हेगारी कृत्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात.