अंबड (जालना) : शहराजवळच असलेल्या घनसावंगी फाटयाजवळील एका पेट्रोल पंपासमोर अंबडकडून भरघाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी साडेदहा वाजता झाला.
याबाबत माहिती अशी की, अंबड तालुक्यातील झिरपी येथील मयुर प्रल्हाद कदम (18)हा तरुण अंबडच्या दिशेने कामासाठी दुचाकीने जात होता. घनसावंगी फाट्याजवळील रस्त्यावर सकाळी 10:30 वाजेदरम्यान असलेल्या चौधरी पेट्रोल पंप समोर कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत मयूरला अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, अधिक उपचारासाठी जालना येथे रवाना करण्यात आले. उपचारादरम्यान जालना येथील जिल्हा रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. मयूर हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूने आई-वडिलांचा आधार हरवला आहे.