वडीगोद्री (जि. जालना) : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आल्याने छगन भुजबळ यांना मंत्रिपद देऊन तात्पुरता आनंद दिला असून, अजित पवार हे जातीयवादी लोकं पोसण्याचे काम करीत असल्याची टीका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली.
भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. छगन भुजबळांच्या आनंदावर शंभर टक्के विरजण पडेल. अजित पवार जातीयवादी लोकं पोसण्याचे काम करत आहेत. याची किंमत त्यांना मोजावी लागेल. भुजबळांना मंत्रिपद देऊ नका असा विरोध अजित पवारांच्या सगळ्या आमदारांनी करायला पाहिजे होता. भुजबळांना मंत्रिपद द्या हा डाव देवेंद्र फडणवीस यांचा असू शकतो. जे मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करत आहेत, त्यांना मंत्रिपद दिलं जात आहे. देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांनी प्रवाहात आणलं. फडणवीसांनी त्यांना क्रॉस करून टाकल्याची टीकाही जरांगे यांनी केली.