फोटो
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : बामणी - आष्टी या जोडरस्त्याचे काम दिंडी मार्गाच्या ठेकेदाराने अर्धवट ठेवले आहे. या अर्धवट रस्ता कामामुळे वाहन चालकांसह प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
परतूर-आष्टी दरम्यान शेगाव-पंढरपूर मार्ग जातो. या रस्त्याचे काम आता पूर्ण होत आले आहे. मात्र, हा पूर्ण झालेला रस्ता अनेक ठिकाणी पुन्हा उखडावा लागत आहे. काही ठिकाणी जोडरस्त्याची कामे ठेकेदाराने अर्धवट ठेवली आहेत. परतूर- आष्टी मार्गावर बामणी ते आष्टी जोडरस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराने अर्धवट ठेवले आहे. नियमानुसार या रस्त्याच्या ठेकेदाराने जोडरस्ते शंभर मीटरपर्यंत करून देणे बंधनकारक आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराने काम तर केले नाहीच मात्र मुख्य रस्त्याचे उखडलेले साहित्यही बाजूलाच टाकले आहे. या रस्त्याची उंची वाढल्याने जोडरस्ते खड्डयात गेले आहेत. या खड्डयात पाणी साचून शेतकऱ्यांच्या व गावकऱ्यांचा वाटा बंद होत आहेत. रस्त्याची उंची वाढल्याने बामणीकडे व शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या या रस्त्याने वाहने, बैलगाडी नेणेच नव्हे तर पायी चालणेही मुश्कील झाले आहे. पावसाळ्यात तर या रस्त्यावरील सर्व पाणी पाणंद रस्त्यात येऊन रस्त्याला नाल्याचे स्वरूप येते. त्यामुळे या रस्त्याने वाहने तर सोडाच पादचाऱ्यांना चालणेही कठीण होते. या विभागाच्या अभियंत्यांनी या जोडरस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराकडून करून घ्यावे व ग्रामस्थ, शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी अशोक मसलकर, कुंडलिक वायाळ, रामराव एकीलवाले, भीमा खामकर, रवी मगर, अनिल ठाकूर, भगवान देवरे, निवृत्ती खालापुरे, कुंडलिक खालापुरे आदींनी केली आहे.
कॅप्शन : बामणी - आष्टी जोडरस्त्याचे काम दिंडी मार्गाच्या ठेकेदाराने अर्धवट ठेवले आहे.