नगरसेवकाच्या पुढाकारातून मंदिराचे सुशोभीकरण
जालना : जुना जालना भागातील पंचायत समिती कार्यालयाच्या बाजूला असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. हे काम होण्यासाठी नगरसेवक ज्ञानेश्वर ढोबळे यांनी पुढाकार घेतला आहे. परिसरात वृक्ष लागवडीसह पेव्हर ब्लॉकही टाकण्यात आले आहेत. सुशोभीकरणाचे काम झाल्याने आता नागरिकांची दर्शनासाठी वर्दळ वाढली आहे.
रुग्णवाहिका नेताना चालकांचे होताहेत हाल
जालना : जुना जालना शहरातील सतकर कॉम्प्लेक्स ते जिल्हा रुग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. रुग्णांना नेत असताना रुग्णवाहिका चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याचे तातडीने काम करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
मित्रांनी केली पक्ष्यांच्या दाणा-पाण्याची सोय
भोकरदन : ताडकळस या गावातील धीरज जनार्दन बनकर या तरुणाने मित्रांना सोबत घेत लिंबाच्या झाडाला प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये पाणी तसेच बाजूलाच पक्ष्यांच्या खाण्याची सोय केली आहे. स्तुत्य उपक्रम सुरू केल्याने त्याच्यासह त्याच्या लहानग्या मित्रांचे कौतुक होत आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून पशुपक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होते आहे. ही बाब लक्षात घेऊन धीरज बनकर याने आपल्या लहानग्या मित्रांना त्यात हर्षदा बनकर, यश बनकर, विकास पवार, अजय बनकर, बंटी बनकर यांना पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्याबाबत सांगितले; आणि सर्वांनी तत्काळ आपल्या घराजवळील लिंबाच्या झाडाला प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या अर्ध्या करून त्यात पाणी टाकून झाडाच्या फांद्यांना बांधल्या.
अकरा हजारांची अवैध दारू पकडली
परतूर : आष्टी रोडवर आनंदवाडी पाटीजवळून एक जण विदेशी दारू अवैधरीत्या घेऊन जात असल्याची माहिती परतूर पोलिसांना मिळाली होती. पोलीस नाईक रामदास फुपाटे आणि सुनील होंडे यांच्या पथकाने सापळा लावून एका व्यक्तीकडून ११ हजार ८६५ रुपये किमतीची १६ लीटर विदेशी दारू जप्त केली. पोलीस नाईक सुनील होंडे यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलिसांत संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास रामदास फुपाटे हे करीत आहेत.
विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटप
भोकरदन : भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तांदूळ, मूग डाळ, हरभरा वाटप करण्यात आले. या प्रसंगी शालेय समिती अध्यक्ष पांडुरंग कानडजे, मुख्यध्यापक बी. पी. ठाकूर, एस. एस. पाटील, आर. वाय. खडके, अनिता भोंबे, मदतनीस माया खराटे, अंजनाबाई सुरडकर, मंगला सोनुने आदींची उपस्थिती होती.
शिक्षण सल्लागार समितीच्या सदस्यपदी ज्ञानेश्वर पुंगळे
राजूर : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या जाणून घेणे व त्या साेडविण्याचे काम तालुकास्तरीय शिक्षण सल्लागार समिती करते. या समितीत शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीची निवड केली जाते. या समितीच्या तालुका सदस्यपदी मेस्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा गणपतदादा इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे यांची निवड झाली आहे. या वेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राम पारवे, आकाश पुंगळे, बाबासाहेब बाेराडे, अमाेल बाेडके, संदीप साेनवणे आदींची उपस्थिती हाेती.
मनापूर येथे ग्रामपंचायततर्फे फिल्टर पाण्याची व्यवस्था
भोकरदन : तालुक्यातील मनापूर येथे ग्रामपंचायतच्या वतीने व सरपंच कासाबाई लक्ष्मणराव दळवी यांच्या विशेष प्रयत्नातून गावाला शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा म्हणून नुकतेच २ लाख रुपये खर्च करून फिल्टर बसविण्यात आले आहे. यामुळे ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
मनापूर ग्रामपंचायत ही सात सदस्य असलेली ग्रामपंचायत असून आतापर्यंत बिनविरोध ग्रामपंचायत निवडण्यात आल्याचा विक्रम आहे. मागील बऱ्याच वर्षांपासून ही ग्रामपंचायत भोकरदन पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मणराव दळवी यांच्या नेतृत्वाखाली गावात विकासाचे काम करीत आहे. मनापूर गावाला नेहमीच पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन दळवी यांनी प्रथम गोकूळ येथील तलावातून गावासाठी पाणी आणले.