- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) :वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन पुन्हा ॲक्शन मोडवर आले आहे. वाळूसह इतर गुन्ह्यातील एका आरोपीला जालना जिल्हासह बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. प्रल्हाद उर्फ पिंटू सुभाषराव मरकड ( रा.गोंदी ता. अंबड) याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई उपविभागीय न्यायदंडाधिकारी अंबड यांनी केली आहे.
गोंदी येथील प्रल्हाद उर्फ पिंटू सुभाषराव मरकड याच्यावर २०२१ मध्ये साष्ट पिंपळगाव येथील गोदावरी नदीपात्रातून ५ ब्रास वाळू चोरी करून वाहतूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. तर २०२३ मध्ये गोंदी येथील सिद्धेश्वर पॉईंट गोदावरी नदीपात्रातून 100 ब्रास वाळू चोरी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 व 57 च्या तरदुती तसेच पोलिस उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक तसेच संबंधित व्यक्तीचे लेखी तसेच तोंडी खुलाशाचे अवलोकन करुन तसेच संबंधित व्यक्तीवर वाळू चोरीसारखे 379, 34 गौण खनिज कायदा 3 व 4 यासारखे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. अवैध वाळू उपसा करणे, वाळूची चोरटी वाहतूक करून विक्री करणे, यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्यामुळे पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 ब 57 प्रमाणे तडीपारीची कार्यवाही करण्यात आली आहे.
आणखी एका वाळू माफियावर कारवाईअंबड तालुक्यातील नऊ वाळू माफियांवर झालेल्या तडीपारच्या कारवाईनंतर गोदापट्ट्यातील आणखी एक वाळू माफियाला तडीपार करण्यात आल्याने गुन्हेगारी वृत्ती व इतर वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. तडीपारची कारवाई करण्यात आलेल्या गोंदी प्रल्हाद उर्फ पिंटू मरकड यास उपविभागीय न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाने पोलीस प्रशासनाकडून त्यास अहिल्यानगर जिल्हा हद्दीत सोडण्यात आले आहे.