भोकरदन : पायात साखळदंड बांधून दोन महिने घरात कोंडून ठेवलेल्या विवाहितेची भोकरदन पोलिसांनी आलापूर भागातून सुटका केली. पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठामार्फत तिला पतीच्या स्वाधीन केले.
भोकरदन शहरालगतच्या आलापूर येथील खालिद शहा सिकंदर शहा यांची मुलगी शहनाज उर्फ सोनल हिचे कुटुंबीय छत्रपती संभाजीनगर येथील मिसाळवाडीत राहत असताना, सागर संजय ढगेसोबत आंतरधर्मीय विवाह केला. त्यानंतर शहा कुटुंबीय आलापूर येथे परत आले. या विवाह संबंधातून शहनाजला ३ वर्षांचा कार्तिक झाला आहे. साधारणतः दोन महिन्यांपूर्वी शहनाजच्या मोठ्या बहिणीची प्रसूती झाल्याने तिचे बाळ पाहण्याच्या कारणाने आईने तिला व पती सागर यांना आलापूर येथे बोलावून घेतले. ते या ठिकाणी आले असता, शहनाज व मुलगा कार्तिकला तिच्या आई-वडिलांनी घरात ठेवून घेतले व पती सागरला घरातून हाकलून दिले. त्यानंतर ७ डिसेंबर रोजी सागर पुन्हा पत्नीला घेण्यासाठी गेला असता, तुझा व आमचा धर्म वेगळा असून, आम्ही शहनाजचे आमच्या धर्मात दुसरे लग्न लावून देणार आहोत, असे म्हणत सागरला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत हाकलून दिले.
मात्र, २४ डिसेंबर रोजी शहनाजच्या बहिणीने सागरला फोन करून शहनाज व मुलाला घरात डांबून ठेवल्याचे सांगितले. त्यामुळे सागरने खंडपीठात धाव घेऊन पत्नी व मुलाची सुटका करण्याची विनंती केली. त्यानंतर उच्च न्यायालयाने भोकरदन पोलिसांना शहनाज व मुलगा कार्तिकची सुटका करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांनी उपनिरीक्षक बी. टी. सहाने व महिला कर्मचारी सीमा देठे आलापूर येथील खालेद शहा यांच्या घरात घुसून शहनाज व कार्तिकला ताब्यात घेतले. यावेळी शहनाजचे दोन्ही पाय साखळदंडाने बांधून त्यांना दोन कुलूप लावल्याचे आढळून आले. पोलिसांनी कुलपांच्या बनावट किल्ल्या तयार करून कुलपे उघडून शहनाजला मुक्त केले. त्यानंतर २९ जानेवारी रोजी उपनिरीक्षक सहाणे यांनी शहनाज व कार्तिक यांना उच्च न्यायालयाचे अतिरिक्त सरकारी अभियाेक्ता ए. आर. काळे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात हजर करून पती सागरच्या स्वाधीन केले.
खंडपीठाने आदेश दिले, आम्ही सुटका केलीया प्रकरणाची पोलिसांना कल्पना नव्हती. मात्र, खंडपीठाने आदेश दिल्यानंतर प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात आले. खालिद शहा कुटुंब मनोरुग्ण असल्यासारखे वागत असल्याने कोणतीही माहिती उपलब्ध होत नव्हती. मात्र, गोपनीय पद्धतीने माहिती जमा करून पोलिसांनी शेवटी शहनाज व कार्तिकची सुटका केली.- बी. टी. सहाणे, पोलिस उपनिरीक्षक पोलीस ठाणे भोकरदन.