लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : बळेगाव (ता.अंबड) शिवारामध्ये बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. या घटनेला दोन दिवस होत नाहीत तोच सोमवारी पहाटे एका ऊसतोड कामगार हे त्यांच्या बैलगाडीतून पत्नीसह शेतात जात असताना बैलगाडी समोर अचानक बिबट्याचे दर्शन झाल्याने मोठी घबराट पसरली होती.नाथनगर (ता.अंबड) येथील बापूराव पाराजी घाडगे, पत्नी कल्पना घाडगे हे दांपत्य सोमवारी ऊसतोडणीसाठी पहाटे चार वाजेच्या दरम्यान नाथनगर येथून महाकाळा - साष्टपिंपळगाव पायवाटीच्या रस्त्यावरून साष्टपिंपळगावकडे जात असतांना साष्टपिंपळगावच्या जवळपास रस्त्याच्या मधोमध अचानक बैलगाडी समोर बिबट्या अवतरला. ऊसतोड कामगार बापूराव घाडगे यांनी बिबट्याला पाहताच त्यांचा थरकाप उडाला. तर बिबट्याला समोरा-समोर पाहून दोन्ही बैल उधळल्याने गाडीचे जू सोडून पळून गेले. बैल उधळल्याने बिबट्याही घाबरून तो परिसरातील झुडपात निघून गेल्याचे घाडगे यांनी सांगितले. या बिबट्याच्या अचानक दर्शनाने सोमवारी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते.
...अन् बिबट्या अवतरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 00:51 IST