मठपिंपळगाव ( जालना) : अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव येथे दुधना नदीपात्रात सोमवारी मध्यरात्री प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल यांनी वेशांतर करून वाळू माफियांविरूद्ध धडाकेबाज कारवाई केली. वाळू तस्करी करणाऱ्या पाच हायवांसह दोन जेसीबी ताब्यात घेण्यात आले आहेत. वाहनांसह सुमारे अडीच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पाच वाळूतस्करांना ताब्यात घेतले आहे.
अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव शिवारातून जाणाऱ्या दुधना नदीच्या पात्रातून अवैधरीत्या वाळू उत्खनन करून बेसुमार वाळू उपसा केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अंबड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आयपीएस सिद्धार्थ बारवाल यांनी वेशांतर करून एका हायवामधून दुधना नदीचे पात्र गाठले. नदीतून वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांना आणि जेसीबी, हायवाचालकांना पोलिस आल्याची कुणकुण देखील लागली नाही. आयपीएस बारवाल हे हायवातून खाली उतरताच त्यांच्यासोबत असलेल्या साध्या गणवेशातील पोलिसांनी वाळू उपसा करणाऱ्या हायवा, जेसीबी वाहने आणि चालकांना गराडा घातला. त्यामुळे त्याठिकाणी असलेली वाहने आणि चालकांना पलायन करता आले नाही. जायमोक्यावरून वाळू उत्खनन करणारे दोन जेसीबी आणि पाच हायवा वाहने ताब्यात घेतले.
सकाळपर्यंत कारवाईवाळू माफियांविरूद्धची कारवाई साेमवारी मध्यरात्री एक वाजता सुरू झाली. ही कारवाई मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होती. या धडाकेबाज कारवाईत पाच वाळूतस्करांना ताब्यात घेण्यात आले असून, सुमारे २ कोटी ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक एस. व्ही. ठुबे, उपनिरीक्षक भगवान नरोडे, विष्णू चव्हाण, दीपक पाटील, तायडे, हिरामण फलटणकर, अरुण मुंडे, भिसे, साठेवाड, चालक भानुसे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.