जालना : समृद्धी महामार्गावर रविवारी दुपारी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात मुंबई वेस्ट येथील सुनीता अमर प्रजापती या महिलेचा मृत्यू झाला. हा अपघातजालना जिल्ह्यातील निधोना शिवारात झाला.
रविवारी दुपारी एक वाजून २० मिनिटांनी निधोना शिवारात टोयोटा फॉर्च्यूनर कार (एमएच ४८ पी २०८५)चे नियंत्रण सुटल्याने वाहन बॅरिकेडला घासत जाऊन उलटले. कारचालक अमर प्रजापती, त्यांची पत्नी सुनीता प्रजापती व मुलगी पायल हे छत्रपती संभाजीनगरकडून नागपूरकडे जात असताना हा अपघात झाला. या अपघातात सुनीता प्रजापती गंभीर जखमी झाल्याने मरण पावल्या. मुलगी पायल प्रजापती यादेखील गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेने जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.
निधोना शिवार येथे ड्यूटीवर असलेले पोलिस उपनिरीक्षक अशोक काळे, अंमलदार खराडे, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुनील राठोड, मनोज राठोड, लहू जाधव यांनी तत्काळ येऊन घटनास्थळी अपघातग्रस्तांना मदत केली. प्रभारी अधिकारी रामदास निकम यांनीदेखील घटनास्थळी भेट देऊन अपघाताची पाहणी केली.