भोकरदन (जालना): तालुक्यातील चोऱ्हाळा ते गारखेड हा वडिलोपार्जित रस्ता मोकळा करण्यावरून सुरू असलेल्या वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. धक्कादायक बाब म्हणजे, ही घटना तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांच्यासह महसूल अधिकारी समोर असतानाच घडली. या मारहाणीत सरपंच कमल लोखंडे यांच्यासह तीन जण गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण?चोऱ्हाळा ते गारखेड दरम्यानच्या गट क्रमांक ११५ आणि १२० मधील वडिलोपार्जित रस्ता काही शेतकऱ्यांनी बंद केला होता. रस्ता मोकळा करून देण्यासाठी सरपंच कमल लोखंडे यांनी तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांना निवेदन दिले होते. या निवेदनाच्या आधारे, २३ सप्टेंबर रोजी तहसीलदार काकडे, मंडळ अधिकारी अर्चना तळोकर आणि तलाठी कविता पठाडे हे दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. मात्र, त्यांच्यासोबत कोणताही पोलिस बंदोबस्त नव्हता.
अधिकारी हतबल, काढता पाय घेतलाअधिकारी रस्ता मोकळा करण्यासाठी पोहोचताच दोन्ही गटांमध्ये वाद सुरू झाला. वाद विकोपाला जाऊन एका गटाने थेट दुसऱ्या गटावर हल्ला केला. यामध्ये अरुण पाचारणे आणि रामेश्वर लोखंडे यांना बेदम मारहाण करण्यात आली, ज्यामुळे त्यांना उपचारासाठी सिल्लोड येथे हलवण्यात आले. सरपंच कमल लोखंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रामसिंग शिंदे आणि गजानन शिंदे यांनी त्यांना शिवीगाळ केली. रामसिंग शिंदे यांनी त्यांना खाली पाडून त्यांचे ब्लाऊज फाडले आणि बांगड्या फोडल्या. तसेच, त्यांचे केस ओढून लाठीने रामेश्वर लोखंडे यांच्या डोक्यावर मारले. याशिवाय, इतर आरोपींनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. ही मारामारी पाहून हतबल झालेल्या तहसीलदारांनी तात्काळ पोलिसांना फोन केला. मात्र, पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी सुरू होती.
१६ जणांवर गुन्हा दाखलया प्रकरणी सरपंच कमल लोखंडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एकूण १६ जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १४३, १४७, १४९, ३२४, ३२३, ३५४, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.