भोकरदन (जालना): भोकरदन येथील बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह नागरी सहकारी पतसंस्थेची शाखा सध्या चर्चेचा आणि गर्दीचा केंद्रबिंदू ठरली आहे. ही पतसंस्था लवकरच बंद पडणार असल्याची अफवा सोशल मीडिया आणि नागरिकांमध्ये पसरल्याने, गेल्या दोन दिवसांपासून आपले तारण असलेले सोने आणि ठेवी काढून घेण्यासाठी खातेदारांनी बँकेत मोठी गर्दी केली आहे. यामुळे बँकेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून खातेदारांना समजावण्याचा प्रयत्न व्यर्थ ठरल्याने कर्मचारी हतबल झाल्याचे दिसून येत आहे.
काय आहे गर्दीचे कारण? मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातून ही अफवा पसरण्यास सुरुवात झाली. सध्या सोन्याचे दर गगनाला भिडले असल्याने आपले तारण असलेले सोने सुरक्षित राहावे, या भीतीने नागरिकांनी बँकेकडे धाव घेतली. भोकरदन तालुक्यात यापूर्वी ज्ञानराधा, रायसोनी आणि मलकापूर अर्बन यांसारख्या बँका व पतसंस्थांमध्ये अनेकांचे पैसे अडकल्याने नागरिक अधिकच घाबरले आहेत. "आधी माझे पैसे द्या, मग इतरांचे," अशी मागणी करत शाखेत मोठी रेटारेटी सुरू असून बँक कर्मचारी या गर्दीमुळे अडचणीत आले आहेत.
शाखाधिकाऱ्यांचा दावा: बँक सुरक्षित! भोकरदनचे शाखाधिकारी दिलीप ताठे यांनी या अफवांचे खंडन केले आहे. ते म्हणाले की, "आमच्या बँकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत चांगली आहे. १ जानेवारी रोजी एका दिवसात नागरिकांनी १ कोटी २५ लाख रुपयांचा भरणा करून आपले सोने परत नेले आहे. शाखेत एकूण १६ कोटी रुपयांचे सोने तारण आहे आणि ते पूर्णपणे सुरक्षित आहे. ग्राहकांनी घाबरून जाऊ नये." एकाच वेळी मोठी गर्दी झाल्याने कामावर ताण येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांच्या मनात भीतीचे सावट घोटाळा झाल्याने पतसंस्था बंद पडण्याच्या घटना मागील काही दिवसांत घडल्याने ग्रामीण भागातील खातेदार अफवांवर लवकर विश्वास ठेवतात. भोकरदन शाखेतील गर्दी कमी होण्याचे नाव घेत नसली तरी, बँकेने व्यवहार सुरळीत असल्याचे सांगून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
Web Summary : A rumor of imminent closure triggered panic at Buldhana Urban Co-operative Bank in Bhokardan. Account holders rushed to withdraw deposits and gold, overwhelming staff despite assurances of the bank's stability. Past bank failures fuel public fear.
Web Summary : बंद होने की अफ़वाह के बाद भोकरदन में बुलढाणा अर्बन बैंक में अफरा-तफरी मची। खाताधारक जमा और सोना निकालने के लिए उमड़ पड़े, बैंक की स्थिरता के आश्वासन के बावजूद कर्मचारी बेबस दिखे। पहले की बैंक विफलताएं जनता में डर पैदा करती हैं।