गेल्या पाच वर्षांपासून मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. जवळपास एक हजार हेक्टर जमीन यासाठी संपादित केली आहे. या संपादनापोटी ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा मावेजा शेतकऱ्यांना दिला आहे. हा रस्ता सहापदरी असून, पूर्णपणे सिमेंटचा आहे. या मार्गावरून जालना शहरात येण्यासाठी तसेच ड्रायपोर्टला जोडण्यासाठी निधोना येथे इंटरचेंज पॉइंटची व्यवस्था करण्यात आली आहे, परंतु अद्याप या इंटरचेंजची जमीन कंपनीकडे न आल्याने त्याचे काम अपूर्ण असल्याचे सांगण्यात आले.
चौकट
नांदेडला जोडणारा समृद्धी महामार्ग
मुंबई ते नागपूर हा समृद्धी महामार्ग आता नांदेडला जोडण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. त्यामुळे तो रस्ता समृद्धीला नेमका कोठून जोडावा यासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही, परंतु त्याचे सर्वेक्षण केले जात असल्याचे सांगण्यात आले.
एक मे ची प्रतीक्षा
या महामार्गावरील वाहतूक एक मे पासून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा सरकारने आधीच केली आहे. त्यामुळे कामाला आता गती आली आहे. या रस्त्याच्या कामावर महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे बारकाईने लक्ष असून, व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी या आधी या रस्ते कामांना भेट देऊन पाहणी केली होती. त्यामुळे एक मे पासून नागपूर ते शिर्डी ही वाहतूक कधी सुरू होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.