जालना : कुठलेही संकट असले की पोलीस ते निवारण्यासाठी तत्पर असतात. आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर सर्वांत प्रथम नाव येते ते पोलिसांचेच. या पोलिसांनी कोरोना काळातही लक्षणीय कामगिरी करून लॉकडाऊन यशस्वी केले आहे. आता कोरोना प्रतिबंधक लस घेण्यातही पोलीस दल आघाडीवर आहे.
जालना जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणास प्रारंभ झाला. यामध्ये आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, तसेच खासगी डाॅक्टर आणि आता ज्येष्ठ नागरिकांना ही लस दिली जात आहे. लसीकरणास सामान्यांचा पाहिजे तसा प्रतिसाद नसला तरी पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी मात्र ही लस हिरीरीने घेत आहेत.
जिल्ह्यात १६ पोलीस ठाणी असून, एकूण कर्मचारी १६८० असून, त्यात १०२ अधिकारी आहेत. या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या लसीकरणावर विभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे जातीने लक्ष असून, दररोज वरिष्ठांना अहवाल सादर करावा लागत आहे.
२०० पोलिसांनी घेतला कोरोनाचा दुसरा डोस
जिल्ह्यातील १ हजार ६८० कर्मचाऱ्यांपैकी पहिला डोस जवळपास १ हजार ८५ जणांनी घेतला आहे, तर त्यात ७० अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. १७६ कर्मचारी आणि २५ पोलीस अधिकाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. उर्वरित पोलिसांचे वेळापत्रक ठरले आहे.
३० टक्के महिला पोलिसांनी घेतली लस
जालना जिल्ह्यातील पोलीस दलात जवळपास ४४७ महिला पोलीस कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांपैकी ५० टक्के महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. जवळपास २७ टक्के महिला कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. काही जणांना अद्याप २८ दिवस पूर्ण न झाल्याने त्या प्रतीक्षेत आहेत.
लसीकरणाच्या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील जवळपास १८ केंद्रांवर नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे त्या त्या तालुक्यातील पोलिसांना पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी जालन्याला येण्याची आता गरज राहिली नाही. याचा चांगला परिणाम पोलिसांच्या अधिक लसीकरणासाठी होत असल्याची प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.