झकीउर रहमान लखवी तुरुंगातच राहणार - पाकिस्तान
By Admin | Updated: December 19, 2014 12:19 IST2014-12-19T12:14:42+5:302014-12-19T12:19:29+5:30
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकीउर रहमान लखवीला दहशतवादविरोधी न्यायालयाने जामीन दिला असला तरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्याची तुरुंगातून सुटका होणार नसल्याचे समजते.

झकीउर रहमान लखवी तुरुंगातच राहणार - पाकिस्तान
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद , दि.१९ - मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकीउर रहमान लखवीला दहशतवादविरोधी न्यायालयाने जामीन दिला असला तरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्याची तुरुंगातून सुटका करणार नाही असे स्पष्टीकरण पाकिस्तान सरकारने दिले आहे.
गुरुवारी पाकमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने झकीउर रहमान लखवीला जामीन मंजूर केला होता. मात्र स्थानिक प्रशासनाने झकीरला पुन्हा ताब्यात घेत त्याला तुरुंगातच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लखवीच्या सुटका झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे स्थानिक प्रशासनाने म्हटले असून लखवी ज्या तुरुंगात आहे त्या तुरुंगाचे सर्व दरवाजेही बंद करण्यात आले आहे. यासोबतच दहशतवादविरोधी न्यायालयाच्या निर्णयाला वरिष्ठ कोर्टात आवाहन देऊ अशी माहिती मुख्य सरकारी वकिल अझहर चौधरी यांनी दिली आहे.
झकीउर लखवी हा २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड असून त्याच्या सुटकेवर भारताने तीव्र आक्षेप घेतला होता. दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलण्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केली असतानाच न्यायालयाने झकीउर लखवीला जामीन दिल्याने पाकचा दुटप्पीपणा सर्वांसमोर आला होता. शुक्रवारी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या निर्णयाविरोधात पाक सरकारकडे निषेध व्यक्त केला. अशा स्थितीत पाक दहशतवादाशी कसा लढा देईल असा प्रश्नही भारताने विचारला आहे.