धिस इज क्वाएट फोटो, दॅट स्पीक्स लाऊडली! - कुणालाही असंच वाटेल हा सोबतचा फोटो पाहून. समर अबू एलूफ नावाच्या महिला फोटोग्राफरने (Photographer Samar Abu Elouf) काढलेला हा फोटो ‘वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर २०२५’ म्हणून निवडला गेला तेव्हाचं निवडकर्त्यांचं हे वाक्य शब्दश: खरंच आहे. ९ वर्षांचा बिनहातांचा देह असलेला हा मुलगा गाझामधला. गाझा इस्त्रायल पॅलेस्टिन संघर्षाच्या बातम्या वाचून निर्ढावलेल्या जगभरातल्या माणसांच्या पोटात हा फोटो पाहून कालवलं नाही तरच नवल.
समर गेली अनेक वर्षे युद्धात होरपळणाऱ्या माणसांच्या आयुष्याचं डॉक्युमेंटशन करतेय. युद्धात महिला आणि मुलांचं काय होतं याचे तिने काढलेले फोटो जगभरातल्या मोठ्या दैनिकांत प्रसिद्ध होतात.
या पुरस्कारानं नंतर तिचं कौतुक होत असताना समर पत्रकारांना म्हणाली, ‘मला दु:ख होतंय, अतिशय वेदनादायी आहे माझं काम. मला नाहीच मिळाले असे फोटो तर चालेल. सतत माणसांची अशी आयुष्य चित्रित करणं फार त्रासदायक आहे!’
ज्या मुलाचा तिनं फोटो काढलाय त्याचं नाव मोहम्मद अजौर. तोही गाझातला. समरही गाझातली. समरची २०२३ मध्ये गाझातून सुटका झाली. आता ती दोहामध्ये राहते.
पुढे मोहम्मद आणि त्याच्या कुटुंबाचीही सुटका झाली. गाझात हवाई हल्ला झाला. त्यात मोहम्मद जखमी झाला. त्याचे हात गेले. आता दोहामध्ये समर आणि मोहम्मद एकाच इमारतीत राहतात. आता त्याचं आयुष्य सावरतं आहे. तो हळूहळू प्रोस्थेटिक हातांनी लिहू लागला आहे.
मोबाइल गेम खेळतो. आपण दार उघडू शकतो याचा त्या लहानशा मुलाला आनंद होतो आहे. त्याला खंत फक्त एकाच गोष्टीची आहे; त्याला त्याच्या आईला मिठी मारता येत नाही!
त्यानं हात गेल्यावर आईला एकच प्रश्न विचारला होता, आता मी तुला मिठी कशी मारू?
हा फोटो आता जगभर गाजला, यापूर्वीही समरला तिच्या फोटोंसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. फोटोग्राफर म्हणून ती जगासमोर अशी युद्ध ‘मांडते’ आहे, ज्या युद्धात भरडणाऱ्या माणसांची कुणाला काहीचीही किंमत नाही. काळजी नाही... आणि कदरही !