युरोपमधील लक्झमबर्ग हा देश आकारमानाने आणि लोकसंख्येने अत्यंत छोटा असला, तरी भारताच्या दृष्टीने तो किती मोठा आहे, याची प्रचिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या दौऱ्यातून आली आहे. "भारत लक्झमबर्गला आपला अत्यंत महत्त्वाचा भागीदार मानतो," असे विधान जयशंकर यांनी केले आहे. फिनटेक, स्पेस टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांसारख्या भविष्यवेधी क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांतील मैत्री आता नव्या उंचीवर पोहोचणार आहे.
मैत्रीचा ७७ वर्षांचा इतिहास
भारत आणि लक्झमबर्ग यांच्यातील राजनैतिक संबंधांची सुरुवात १९४८ मध्ये झाली होती. गेल्या सात दशकांपासून हे दोन्ही देश जागतिक व्यासपीठावर एकमेकांचे खंदे समर्थक राहिले आहेत. एस. जयशंकर यांनी लक्झमबर्गचे पंतप्रधान ल्यूक फ्रायडन आणि उपपंतप्रधान झेवियर बेटेल यांची भेट घेऊन गुंतवणूक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यावर सविस्तर चर्चा केली.
भारतासाठी लक्झमबर्ग का महत्त्वाचा?
६ लाख लोकसंख्या असलेल्या या देशाची भारतासोबतची आर्थिक नाळ अत्यंत घट्ट आहे. लक्झमबर्ग स्टॉक एक्सचेंजमध्ये १७० हून अधिक भारतीय कंपन्या लिस्टेड आहेत, जे दोन्ही देशांतील आर्थिक विश्वासार्हतेचे प्रतीक आहे. लक्झमबर्गमधील अनेक कंपन्या गेल्या दोन दशकांपासून भारताच्या 'मेक इन इंडिया' मोहिमेत सक्रिय असून भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. लक्झमबर्गमधील अनेक स्वयंसेवी संस्था भारतातील स्थानिक भागीदारांसोबत आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. दरवर्षी भारतातील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये लक्झमबर्ग आपले चित्रपट आणि प्रॉडक्शन दाखवून सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करत असतो.
१९८३ पासून सुरू झाला भेटींचा सिलसिला
१९८३ मध्ये ग्रँड ड्यूक जीन हे भारत भेटीवर येणारे लक्झमबर्गचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले होते. त्यानंतर २००२ मध्ये नवी दिल्लीत लक्झमबर्गने आपला दूतावास उघडला. तेव्हापासून दोन्ही देशांतील मंत्री आणि उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या भेटींची संख्या सातत्याने वाढत आहे. आजच्या काळात जेव्हा जगभरात आर्थिक समीकरणे बदलत आहेत, तेव्हा लक्झमबर्गसारख्या आर्थिकदृष्ट्या प्रगत देशाशी असलेली भागीदारी भारतासाठी 'गेम चेंजर' ठरू शकते, असा विश्वास एस. जयशंकर यांनी व्यक्त केला आहे.
Web Summary : Luxembourg, though small, is a key partner for India in fintech, space tech, and AI. Strong ties exist through trade, investment, and cultural exchange, with many Indian companies listed on the Luxembourg Stock Exchange. This partnership is set to be a game-changer.
Web Summary : छोटा होने पर भी, लक्जमबर्ग भारत के लिए फिनटेक, स्पेस टेक और एआई में एक महत्वपूर्ण भागीदार है। व्यापार, निवेश और सांस्कृतिक आदान-प्रदान के माध्यम से मजबूत संबंध हैं, कई भारतीय कंपनियां लक्जमबर्ग स्टॉक एक्सचेंज में सूचीबद्ध हैं। यह साझेदारी गेम-चेंजर साबित होने वाली है।