इस्त्रायल आणि इराण या दोन देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव सुरू आहे. दोन्ही देशांनी एकमेकावर हल्ले वाढवले आहेत. आता या संघर्षा दरम्यान, आणखी तीन इराणी विमाने ओमानच्या मस्कतला रवाना झाली आहेत. इराण ओमानच्या माध्यमातून इस्रायलसोबत गुप्त राजनैतिकतेचा मार्ग स्वीकारत असल्याचा दावा करण्यात आला आहे. याआधी बुधवारीही तीन इराणी सरकारी विमाने ओमानला दाखल झाली होती.
साहा एअरलाइन्सचे दोन बोईंग 787 आणि मेराज एअरचे एक एअरबस A320 हे विमान मस्कत, ओमानसाठी इराणी हवाई हद्द सोडल्याची माहिती शुक्रवारी ( २० जून ) रोजी समोर आली. बुधवारी ओमानमध्ये आलेली तीन विमाने राजनैतिक प्रतिनिधीमंडळांना घेऊन जात होती असे इराणने म्हटले होते. पण, नंतर इराणने आपले विधान मागे घेतले.
बुधवारी मस्कतमध्ये आलेल्या तीन विमानांमध्ये इराणी राष्ट्राध्यक्षांचे मुख्य विमान आणि इतर दोन सरकारी विमाने होती. इराणी विमानांमध्ये दोन एअरबस A321 आणि एक एअरबस A340 होते. या विमानांबद्दल कोणतीही अधिकृत विधान करण्यात आले नाही.
दरम्यान, आता इराण ओमानद्वारे शांतता वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर दुसरीकडे इराणचे नेतृत्व या विमानांमध्ये बसून देश सोडून जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची शुक्रवारी जिनेव्हा येथे युरोपियन युनियनच्या नेत्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. अशात इराणी विमानांचा ओमान दौरा होत आहे. ओमानने प्रादेशिक संघर्षात तटस्थ भूमिका बजावली असून त्यामुळे ते इस्रायल आणि इराणमधील शांतता चर्चेत मध्यस्थी करू शकते असे मानले जाते.
शांतता कराराबद्दल इराणने काय सांगितले?
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरागची म्हणाले, जोपर्यंत इस्रायलचे हल्ले सुरू राहतील तोपर्यंत कोणतीही चर्चा होणार नाही.'जोपर्यंत इस्रायलचे हल्ले सुरू राहतील तोपर्यंत आम्ही कोणत्याही पक्षाशी चर्चेसाठी तयार नाही.' इराण अमेरिकेच्या संपर्कात आहे हेही त्यांनी नाकारले. अमेरिकेसोबतच्या चर्चेच्या सर्व चर्चा बनावट आहेत, असंही अरागची म्हणाले.